निवडणूक कामकाजाचे चित्रीकरण करणाऱ्यांवर गुन्हा

पुणे – भोर विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसंबंधी कामकाजाचे मोबाइलवरुन चित्रीकरण केले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी दोन उमेदवारांच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली आहे.
सरदार कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोर येथे बुधवारी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेचे कामकाज सुरू होते. यावेळी मोबाइलसह अन्य उपकरणांना बंदी असताना विजय हनुमंत राऊत, रा. लवळे (ता. मुळशी) आणि नारायण आनंदराव कोंडे रा. केळवडे (ता. भोर) यांनी बेकायदेशीरपणे मॉकपोलचे चित्रीकरण करुन ते सोशल मीडियावर प्रसारित करुन गोपनियतेचा भंग केला.
त्यामुळे विजय हनुमंत राऊत आणि नारायण आनंदराव कोंडे यांच्यावर 14 नोव्हेंबर रोजी भोर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांर्भीय लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर येथे भेट देत घटनेची माहिती घेतली, असेही डॉ. खरात यांनी म्हटले आहे.
“ईव्हीएम कमिशनींग, मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र आदी ठिकाणी निवडणूक प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यादरम्यान निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, मतदान प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी, मतदार, वार्ताहर आदी कोणाही व्यक्तीला कोणताही मोबाईल, स्मार्टवॉच, इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन येण्यास पूर्णत: बंदी आहे. तसेच निवडणूक कामकाजाचे व्हिडीओ तसेच छायाचित्रे काढून विविध व्हॉटस्अॅप ग्रुप, सोशल मीडियावर प्रसारित करणे हा गंभीर गुन्हा आहे. असे करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्यात येईल.” – डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी





