Nagar | माजी महापौर संदीप कोतकरांसह दोनशे कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हा

नगर, (प्रतिनिधी) – केडगावात शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडातील पीडित कुटुंबाला धमकावणे आणि विनापरवाना मिरवणूक काढून मेळावा घेतल्याच्या कारणावरून माजी महापौर संदीप कोतकर याच्यासह सुमारे दोनशे कार्यकर्त्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संग्राम संजय कोतकर व कोतवालीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम मुरलीधर वाघमारे यांनी यासंदर्भात फिर्यादी दिल्या आहेत.
संदीप कोतकर यांना अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यांच्यावरील जिल्हा बंदीची अट उच्च न्यायालयाने शिथील केली आहे. मात्र, केडगावतील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात असलेली जिल्हा बंदीची अट शिथील करण्याबाबत त्यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाची गुरुवारी (दि.२४) सुनावणी होती. त्यासाठी ते अहिल्यानगरला आले होते.
मात्र, त्याआधी केडगावमध्ये त्यांनी विना परवाना मिरवणूक काढली व मेळावा घेतला. सायंकाळी केडगावातील नेप्ती रोडवर राहणाऱ्या माजी नगरसेविका सुनीता संजय कोतकर यांच्या घरासमोर शक्तीप्रदर्शन करीत दंड थोपटल्याच्या दोन स्वतंत्र तक्रारींवरून संदीप कोतकरसह सुमारे दोनशेजणांविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले आहेत.
या फिर्यादीत म्हटले आहे की, केडगाव येथे जेसीबी व क्रेन लावून फटाके फोडत संदीप कोतकर यांची मिरवणूक काढली. या रॉलीत अंदाजे पाचशे ते सहाशे कार्यकर्ते होते. ही मिरवणूक घरासमोर आल्यावर दुचाकी व चार चाकी वाहने उभे करुन मोठ्याने ‘संदीप कोतकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देऊ लागले. त्यावेळी त्यातील काहीजण घरासमोर आले.
त्यामध्ये संदीप कोतकर ही होता. घराकडे बघून दंड थोपटीत होता.याबाबतचे व्हिडिओ ही आहे. त्यानुसार आरोपी संदीप भानुदास कोतकर, सचिन भानुदास कोतकर, विनोद लगड, नीलेश बाप्पू सातपुते, भूषण अशोक गुंड, रमेश तात्याभाऊ कोतकर, विजय कोतकर, अशोक रावसाहेब कोतकर,
संताष बारस्कर, सोमनाथ बन्सी कराळे, अशोक मोहन कराळे, ऋषीकेश हरि सातपुते, गणेश पांडुरंग सातपुते, गणेश अंजाबापू सातपुते, सागर अंजाबापू सातपुते, भुषण सोनु सुपेकर व इतर दोनशे (सर्व रा. केडगाव, ता. जि. अहिल्यानगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विना परवाना मिरवणूक व मेळावा
पोलीस हेड कॉन्स्टेबल विक्रम वाघमारे यांनी सरकारतर्फे दुसरी फिर्याद दिली आहे. ते पोलिसांच्या फ्लाईंग स्कॉडमध्ये काम करीत आहेत. गुरूवारी (दि.२४) सायंकाळी ६ ते रात्री साडेनऊ दरम्यान रेणुकामाता मंदिर केडगाव ते एकनाथनगर, केडगाव (अहिल्यानगर) अशी संदीप भानुदास कोतकर (रा. एकनाथनगर केडगाव), सुनील सर्जेराव कोतकर (रा केडगाव अहिल्यानगर),
संतोष सुखदेव बारस्कर (रा. केडगाव), ४. गणेश आंनदकर (रा कायनेटीक चौक, अहिल्यानगर), जालिंदर कोतकर (रा केडगाव, अहिल्यानगर) यांनी २०० ते २५० लोकांना एकत्र जमवुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करुन विनापरवाना मिरवणूक काढून, एकनाथनगर केडगाव येथे मेळावा घेऊन त्यामध्ये विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ते लोक संदीप दादा तुम् आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत होते. त्यानंतर ते रेणुकामाता मंदिर येथून घोषणा देत देत एकनाथनगर (केडगाव) येथे त्यांच्या राहत्या घरी रॅली काढून गेले. या ठिकाणी गेल्यानंतर रात्री ८ ते ९.३० दरम्यान ध्वनीक्षेपकाचा वापर करुन जमलेल्या लोकांचे उपस्थितीत सभा घेतली.
सभा संपल्यानंतर आम्ही संदीप भानुदास कोतकर याने रेणुकामाता मंदिर केडगाव ते एकनाथनगर अशी काढलेली पायी रॅली तसेच एकनाथनगर केडगाव येथे घेतलेली सभा यासाठी वापरण्यात आलेले ध्वनीक्षेपक परवानगीबाबत खात्री केली असता परवानगी नसल्याचे समजले, असेही या तक्रारीत स्पष्ट केले आहे.





