नगर | तडीपार असतांना आरोपी शहरात

नगर,(प्रतिनिधी) – शिवजयंती उत्सव शहरात शांततेत व व्यवस्थीत पार पाडावा या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत २४४ जणांना दोन दिवसाकरिता हद्दपार करण्यात आले होते. मात्र, कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत शहरातून तडीपार असतांना संशयीत आरोपी शहरात फिरत असतांना कोतवाली पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
महेश सुरेश दळवी (रा. बुर्हानगर, ता. नगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. या बाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहितीनुसार संशयीत आरोपी दळवी हा मार्केटयार्ड परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकास सूचना करून आरोपी ताब्यात घेण्याचे सांगितले.
पथकाने मिळालेल्या माहितीनुसार मार्केट यार्ड परिसरात सापळा रचून अरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई सहाय्यक फौजदार राजेंद्र गर्गे, याकुब सय्यद, ज्ञानेश्वर मोरे, होमगार्ड अजवे यांच्या पथकाने केली.





