nagar | दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करत तरूणाला मारहाण

नगर, (प्रतिनिधी) – दारू पिण्यासाठी पैशाची मागणी करून युवकाला दोघांनी मारहाण केली. ओम अनिल गायकवाड (वय २० रा. भोसले आखाडा) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप शिंदे ऊर्फ म्हम्या, दीपक शिंदे (दोघे रा. चंदन इस्टेट, शिल्पा गार्डन समोर, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मंगळवारी (दि. १४) रात्री ११ वाजता ओम घरी जात असताना संदीप व दीपक यांनी त्यांना आवाज देऊन थांबविले. आम्हाला दारू प्यायची आहे, आम्हाला पैसे दे असे म्हणून मारहाण केली व खिशातील पाच हजार रूपये काढून घेतले.
संदीपने ओमला फायटरने मारहाण करून जखमी केले. दीपकने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी ओम यांनी उपचार घेतल्यानंतर बुधवारी (दि. 15) रात्री पोलिसात फिर्याद दिली. पोलीस अंमलदार व्हि. वाय. सोनवणे अधिक तपास करत आहेत.





