Olympics 2028 मधील क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर! कधी आणि कुठे होणार सामने? जाणून घ्या

Cricket Comeback at Olympics 2028 : क्रिकेटसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या पुनरागमनाबाबत मोठी घोषणा झाली आहे. या ऑलिम्पिकमधील क्रिकेटच्या पदक सामन्यांच्या तारखा आणि मैदानाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेट पुन्हा ऑलिम्पिकमध्ये परतत आहे. याआधी 1900 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळलं गेलं होतं.
कधी आणि कुठे खेळले जाणार क्रिकेट सामने?
त्या वेळी फक्त दोन संघ, ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स, यांनी भाग घेतला होता. त्या ऐतिहासिक सामन्यात ग्रेट ब्रिटनने विजय मिळवून सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यानंतर क्रिकेट ऑलिम्पिकमधून बाहेर राहिलं. आता लॉस एंजिल्समध्ये क्रिकेट पुन्हा दमदार पुनरागमन करत आहे. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेट सामने लॉस एंजेलिसपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोमेना शहरातील फेयरग्राउंड्स स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.
किती दिवसांची असणार स्पर्धा?
Big news!🚨
We’re celebrating being exactly three years out from the 2028 Olympic Games by sharing the OFFICIAL OLYMPIC COMPETITION SCHEDULE! From where the first medal will be awarded to action-packed days that already have us cheering, this schedule is the first step in… pic.twitter.com/8rgSjFwlgQ
— LA28 (@LA28) July 14, 2025
क्रिकेट स्पर्धेची सुरुवात 12 जुलै 2028 रोजी होईल, तर सुवर्णपदकाचे सामने 20 आणि 29 जुलै रोजी खेळले जातील. या ऑलिम्पिकमध्ये एकूण 16 दिवस क्रिकेटचा थरार पाहायला मिळेल. आता कोणते दोन संघ महिला आणि पुरुष गटात सुवर्णपदक जिंकतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. मात्र, यासाठी अजून तीन वर्षे वाट पाहावी लागेल. भारतीय पुरुष आणि महिला संघ पदक जिंकण्यासाठी प्रबल दावेदार म्हणून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होताना दिसतील.
हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंडचा मास्टरप्लॅन! भारताविरुद्ध चौथ्या कसोटीसाठी संघात मोठा बदल
प्रत्येक गटात 6-6 संघांचा असणार सहभागी
पुरुष आणि महिला या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी 6 संघ सहभागी होतील. प्रत्येक संघ 15 खेळाडूंचा चमू जाहीर करेल. अशा प्रकारे, दोन्ही गटांमध्ये एकूण 180 खेळाडू या ऐतिहासिक ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतील. स्पर्धेचे स्वरूप असे ठेवण्यात आले आहे की, बहुतांश दिवस दोन सामने खेळवले जातील. मात्र, 14 आणि 21 जुलै रोजी कोणतेही सामने आयोजित केले जाणार नाहीत.
हेही वाचा – Aiden Markram : ICC पुरस्कारावर एडेन मारक्रमची मोहर, WTC फायनलमधील कामगिरीला सलाम!
आयओसीने पाच नव्या खेळांना दिली मंजुरी –
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) 2028 च्या ओलंपिकसाठी पाच नव्या खेळांना मंजुरी दिली आहे. यामध्ये क्रिकेटसह बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस (सिक्स) आणि स्क्वॉश यांचा समावेश आहे. क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे भारतात क्रिकेटची प्रचंड लोकप्रियता. क्रिकेटच्या समावेशामुळे ऑलिम्पिकमधील खेळांची विविधता आणि उत्साह आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.





