क्रिकेट कॉर्नर : रहाणेबाबतचे कवित्व कधी संपणार ?

– अमित डोंगरे
पुणे – चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत वादळी फलंदाजी केली होती. त्याबाबत चेन्नईच्या महेंद्रसिंह धोनीने रहाणेचे गुणगानही केले होते. यावर वीरेंद्र सेहवागने धोनीवर ताशेरे ओढले आहेत. कारकीर्दीतील बराचसा काळ रहाणेने धोनीच्याच नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले, तेव्हा रहाणेकडे सातत्य नसल्याने त्याचे संघातील स्थान गेले होते. जर धोनी कर्णधार असतानाही रहाणेचे संघातील स्थान जाते तर मग आता धोनीला चेन्नई संघात रहाणेच का हवा आहे, असा सवाल सेहवागने विचारला आहे.
खरेतर सध्या धोनीवर टीका करण्याची एक नवी फॅशनच आल्यासारखी वाटते. याच धोनीने सेहवागला सातत्याने अपयशी ठरुन व अनेकांचा विरोध पत्करुनही संघात कायम ठेवले होते हे सेहवागच विसरलेला दिसतो. आता त्याने धोनीवर टीका करताना खांदा मात्र, रहाणेच्या नावाचा वापरला आहे.
खरी बोच वेगळीच आहे. सेहवागलाही कधीतरी भारतीय संघाचे नेतृत्व करायचे होते पण ते धोनीमुळेच शक्य झाले नव्हते. जी खंत सेहवागची होती, तीच काही प्रमाणात युवराजसिंगचीही होती. त्यातही दिल्लीच्याच गौतम गंभीरने विश्वकरंडक 2011 साली केलेली खेळी विश्वविजयाचा उल्लेख करताना कोणी दखल घेत नाही म्हणून गौतम गंभीरही सातत्याने धोनीला लक्ष्य करत असतो.
त्यातच आता रहाणेवरून सेहवाग धोनीवर टीका करत आहे. तसे पाहायला गेले तर रहाणेचे संघातील स्थान त्याच्याच सुमार कामगिरीमुळे गेले होते. किती संधी देणार निवड समिती तरी. कुठेतरी कठोर निर्णय घ्यावा लागतोच. परंतु यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नईकडून खेळताना रहाणेने वादळी फलंदाजी केली म्हणून लगेच त्याला भारतीय संघातही स्थान मिळावे ही अपेक्षा योग्य आहे का याचाही विचार केला जावा.
रहाणेने खेळलेला डाव निश्चितच कौतुकास्पद होता पण त्याला भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघात घ्या अशी जर आता मागणी होत असेल त्याला बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल. जूनमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. रहाणेला इंग्लंडमध्ये खेळण्याचा आनुभवही आहे. या सामन्यासाठी त्याचा विचार जरुर केला जावा पण त्याच्या नावावरून आता आयपीएल स्पर्धेत सुरु झालेले कवित्व मात्र, लवकरात लवकर संपायला हवे.





