क्रिकेट कॉर्नर : रोहितने पायउतार व्हावे

– अमित डोंगरे
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याने उर्वरित सामन्यांतून माघार घेत कर्णधारपदही अन्य खेळाडूकडे सुपूर्त करावे. त्याच्याकडून मोठी तर सोडाच, परंतु छोटी खेळीही होत नाही. मग तो सलामीला का फलंदाजीला येतो. बस झाले, आता तरी त्याने किमान यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तरी थांबलेले उत्तम.
गुणवत्ता आहे, दर्जा आहे, एका फलंदाजाला ज्या गोष्टींची गरज असते ते सर्वकाही रोहितकडे आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे जिद्द, आणि तीच नेमकी रोहितच्या फलंदाजीत दिसत नाही. काही महिन्यांपूर्वीपर्यंत आपण सगळेच विराट कोहलीला तो तीन वर्षे सुमार कामगिरी करत होता म्हणून टीकेचा धनी बनवले. त्यात चाहत्यांपेक्षा संजय मांजरेकर, विक्रमादित्य सुनील गावसकर यांच्यापासून आजी-माजी कसोटीपटू व समालोचक कोहलीवर तोंडसुख घेत होते. मग आता हे सगळे मूग गिळून गप्प का आहेत.
रोहितच्या बॅटमधून जे फटके पूर्वी लिलया मारलेले दिसायचे, त्याच फटक्यांवर आज तो गल्लीतल्या एखाद्या खेळाडूप्रमाणे बाद होत आहे. इनकमिंग चेंडू ही तर त्याची सर्वात मोठी कमजोरी होती व आजही आहे. त्याने यावर काहीही उपायही शोधून काढलेला नाही. कोणताही नवोदित गोलंदाज त्याला मामा बनवत असल्याचे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दिसले. एकदा सौरव गांगुली अशाच अपयशी कालखंडातून जात असताना एक विनोद सांगितला जात होता.
कोणीही ड्रेसिंग रुममध्ये लॅंडलाईन क्रमांकावर फोन करतो व म्हणतो, मला गांगुलीशी बोलायचे आहे. त्यावर पलीकडची व्यक्ती म्हणते की, तो फलंदाजीला गेला आहे. त्यावर फोन करणारा म्हणतो, काही हरकत नाही, मी होल्ड करतो. असे का, तर त्यावेळी गांगुली खरोखऱ लवकर बाद होत होता. त्यावर हा विनोद निर्माण झाला आहे. खेळाडू बदलला, गांगुलीच्या जागी रोहित आला, बाकी सर्व चित्र तेच राहिले, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आत्मपरीक्षण करत रोहितने थांबावे व एका नवोदिताला संधी द्यावी.





