क्रिकेट कॉर्नर : …अखेर समेट घडला

– अमित डोंगरे
दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघात झालेला सामना विजय व पराजय यापेक्षाही जास्त चर्चेत आला तो दोन हाडवैरी व्यक्तींमधील समेटामुळे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली व बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली यांच्यात अखेर समेट घडला. या सामन्यानंतर या दोघांनी हॅण्डशेक केले व गेले कित्येक दिवस सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला. आता हेच कोहली व गंभीर यांच्यातही व्हावे हीच अपेक्षा.
कर्णधारपद काढून घेतले जाणे, रोहित शर्माच्या हाताखाली खेळावे लागणे या सगळ्यामागे गांगुलीच होता हा पक्का विश्वास कोहलीला होता. या दोघांमधून विस्तवही जात नव्हता. कारण या दोघांमध्ये वादाचा मुद्दा होता तो रवी शास्त्री यांच्याशी असलेली कोहलीची जवळीक. शास्त्री जेव्हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते तेव्हापासून त्यांचे व कोहलीचे संबंध खूपच जऴळचे बनले होते. शास्त्री सातत्याने कोहलीला पाठिंबा देत होते.
कोहलीच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या तरीही ते सगळ्यांच्या विरोधात जाऊन कोहलीसाठी रदबदली करत होते. त्यातच बीसीसीआयच्या अध्यक्षपदी गांगुली यांची नियुक्ती झाली व शास्त्री हटाव मोहीम सुरू झाली. रोहितच्या खांद्यावर बंदूक ठेवत पहिली विकेट कोहलीची पडली व पाठोपाठ शास्त्रींची. याच कालावधीत रोहित व कोहली यांच्यातही काहीतरी बिनसल्याच्या चर्चेने जोर धरला व काट्याने काटा काढणे ही म्हण गांगुलीने प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवली. खरेतर जेव्हा कोहली संघात आला तेव्हा तो गांगुलीचा सर्वात लाडका खेळाडू होता मात्र, शास्त्रींच्या व कोहलीच्या जवळीकीमुळे हा लाडका दोडका कधी बनला तेच कळले नाही.
यंदाची आयपीएल स्पर्धा सुरू झाली व त्यात दिल्ली आणि बंगळुरू यांच्यात पहिला सामना जेव्हा झाला. त्यावेळी सामना संपल्यावर गांगुली व कोहली एकमेकांसमोर तर आले, पण हॅण्डशेक केला नाही. आता मात्र साखळीतील दुसरा सामना झाला व या दोघांनी झाले गेले विसरून जाऊन थाटात हॅण्डशेक केले व सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला.





