Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी मोठी घोषणा; ‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत गावागावातून घडणार चॅम्पियन्स!
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्रातील खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय पदकांच्या शर्यतीत जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी 'मिशन लक्षवेध'चा विस्तार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Maharashtra Budget 2026 Sports Announcement : भारताचे २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महत्त्वाच्या घोषणा केल्या. महाराष्ट्रातील खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय पदकांच्या शर्यतीत जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करण्यासाठी ‘मिशन लक्षवेध’चा विस्तार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
आणखी ४ नवीन ‘हाय परफॉर्मन्स सेंटर’ची निर्मिती –
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातून जास्तीत जास्त ऑलिम्पिक पदके यावीत, यासाठी १२ महत्त्वाच्या खेळांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, कुस्ती, नेमबाजी आणि लॉन टेनिस यांसारख्या खेळांसाठी राज्यात ८ हाय परफॉर्मन्स सेंटर आधीच कार्यरत आहेत. आता खेळाडूंना जागतिक दर्जाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळावे, यासाठी अशाच प्रकारची आणखी ४ नवीन केंद्रे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
दुर्गम भागातील टॅलेंट शोधण्यासाठी त्रिस्तरीय रचना –
राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, यासाठी सरकारने एका विशेष संरचनेची घोषणा केली आहे:
- विभाग स्तर: राज्यात २५ क्रीडा उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली जातील.
- जिल्हा स्तर: ९६ गुणवत्ता विकास केंद्रे सुरू केली जातील.
- तालुका व जिल्हा स्तर: रखडलेल्या क्रीडा संकुलांच्या कामांना गती देऊन त्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.
केवळ प्रशिक्षणच नाही, तर सुविधांवरही भर –
“भारत २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी प्रयत्नशील असताना, महाराष्ट्रातील खेळाडू त्यात मागे राहू नयेत हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे फडणवीस यांनी ठामपणे नमूद केले. खेळाडूंना केवळ कौशल्य प्रशिक्षण देऊन न थांबता, त्यांना आवश्यक असणारी अत्याधुनिक मैदाने, आधुनिक जिम आणि राहण्यासाठी उत्तम निवास व्यवस्था यांसाठी अर्थसंकल्पातून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.






