World Para Athletics Grand Prix Delhi 2026 : भारतीय क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकून जगात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आता भारताचे लक्ष ११ ते १३ मार्च २०२६ या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या ‘वर्ल्ड पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्री’च्या दुसऱ्या आवृत्तीवर लागले आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत आपल्या ताकदीचे प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झाला असून, जगातील आठ महत्त्वाचे देश यात सहभागी होणार आहेत. आठ देशांमधील २५० खेळाडूंचे आव्हान – नवी दिल्लीत होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारत, रशिया, नेपाळ, भूतान, हाँगकाँग, सर्बिया, बोस्निया आणि इजिप्त अशा आठ देशांमधील २५० हून अधिक खेळाडू पदकांसाठी झुंज देणार आहेत. पॅरालंपिक कमिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया यांच्या मते, अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेचे यजमानपद मिळणे हे जागतिक पॅरा क्रीडा क्षेत्रात भारताचा वाढता दबदबा दर्शवते. भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ – या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे भारत आपले आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक मैदानात उतरवत आहे. ट्रॅक आणि फील्ड स्पर्धांमध्ये भारताचे तब्बल २१९ खेळाडू आव्हान सादर करतील. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार खेळाडूंची विभागणी ७४ स्लॉटमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये शारीरिक अपंगत्व असलेल्या ॲथलीटसाठी ३९, दृष्टिबाधित ॲथलीटसाठी २९ आणि बौद्धिक अक्षमता असलेल्या ॲथलीटसाठी ६ श्रेणींचा समावेश आहे. पॅरिस पॅरालंपिकमधील यशानंतर भारतीय पॅरा-अॅथलीटचा आत्मविश्वास उंचावलेला असून, घरच्या मैदानावर जास्तीत जास्त पदके जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे.