Cricket Australia : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) २०२५ कॅलेंडर वर्षातील टेस्ट क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची ‘बेस्ट टेस्ट XI’ जाहीर केली आहे. या संघाचे वैशिष्ट्य म्हणजे कर्णधारपदी दक्षिण आफ्रिकेच्या तेंबा बावूमाची निवड करण्यात आली आहे. बावूमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने यावर्षी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले आणि भारताला त्यांच्याच मैदानावर 2-0 असे व्हाईटवॉश दिले. या संघात ऑस्ट्रेलियाचे चार, भारताचे चार, दक्षिण आफ्रिकेचे दोन आणि इंग्लंडचा एक खेळाडू आहे. भारतीय खेळाडूंमध्ये सलामीवीर केएल राहुल, मधल्या फळीतील शुबमन गिल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि १२वा खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाची बेस्ट टेस्ट XI ऑफ 2025 सलामीवीर: केएल राहुल (भारत), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) मधली फळी: जो रूट (इंग्लंड), शुबमन गिल (भारत), तेंबा बावूमा (कर्णधार, दक्षिण आफ्रिका) यष्टिरक्षक:ॲलेक्स कॅरी (ऑस्ट्रेलिया) अष्टपैलू: बेन स्टोक्स (इंग्लंड) वेगवान गोलंदाज: मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), जसप्रीत बुमराह (भारत), स्कॉट बोलँड (ऑस्ट्रेलिया) फिरकी गोलंदाज:सायमन हार्मर (दक्षिण आफ्रिका) १२वा खेळाडू: रवींद्र जडेजा (भारत) या निवडीमागे खेळाडूंच्या 2025 मधील वैयक्तिक कामगिरीचा विचार करण्यात आला आहे. ट्रॅव्हिस हेडने सलामीला येऊन शतके झळकावली, तर केएल राहुलने परदेशात आणि घरीही सातत्यपूर्ण धावा काढल्या. जो रूटने यावर्षीही मोठ्या धावा केल्या, शुबमन गिलने लागोपाठ शतके झळकावत सर्वाधिक धावा केल्या. तेंबा बावूमाला त्याच्या नेतृत्वगुणांसाठी आणि क्लच परफॉर्मन्ससाठी कर्णधारपद देण्यात आले. गोलंदाजी विभागात मिचेल स्टार्कने सर्वाधिक बळी घेतले, जसप्रीत बुमराहने विविध खंडांवर प्रभावी मारा केला, तर स्कॉट बोलँड आणि सायमन हार्मर यांनी महत्त्वपूर्ण मालिकांमध्ये कमाल केली. बेन स्टोक्सने अष्टपैलू कामगिरीने संघात स्थान मिळवले. हा संघ जाहीर करताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले की, 2025 हे टेस्ट क्रिकेटसाठी रोमांचक वर्ष ठरले, ज्यात दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व, ऑस्ट्रेलियाची घरच्या मैदानावर अपराजित मालिका आणि इंग्लंडसोबतची ॲशेस मालिका यांचा समावेश आहे.