Nicholas Pooran : फाल्कन्सविरुद्धच्या सामन्यात पूरनचा चढला पारा, रागाच्या भरात असं काही केलं की…VIDEO होतोय व्हायरल

CPL 2025 Nicholas Pooran Angry Video : कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) 2025 च्या सातव्या सामन्यात अँटिगुआ अँड बारबुडा फाल्कन्सने त्रिनबागो नाइट रायडर्सवर 8 धावांनी रोमांचक विजय मिळवला. सर विव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर 20 ऑगस्ट रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात फाल्कन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 167 धावा केल्या. प्रत्युत्तरात, 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा नाइट रायडर्सचा संघ 20 षटकांत 6 बाद 159 धावाच करू शकला. या सामन्यादरम्यानचा निकोलस पूरनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
निकोलस पूरनचा संताप –
168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नाइट रायडर्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अॅलेक्स हेल्स अवघ्या 5 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार निकोलस पूरनकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु पूरनला 14 चेंडूंमध्ये केवळ 10 धावा करता आल्या. दहाव्या षटकात रहकीम कॉर्नवालच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात पूरन क्रीझबाहेर गेला आणि अंदाज चुकल्याने तो यष्टिरक्षक ज्वेल अँड्र्यूकडून यष्टिचीत झाला. आऊट झाल्यावर पूरनला आपला राग अनावर झाला आणि तो संतापात जमिनीवर हात आपटताना दिसला.
Pooran bamboozled! 💫
Rahkeem Cornwall gets the TKR Skipper! 💥#CPL25 #CricketPlayedLouder#BiggestPartyInSport #ABFvTKR #Sky365 pic.twitter.com/kBmHmwgIFZ
— CPL T20 (@CPL) August 21, 2025
पोलार्डची धडाकेबाज खेळी ठरली व्यर्थ –
नाइट रायडर्सकडून सलामीवीर कॉलिन मुनरोने 18 चेंडूंमध्ये 44 धावांची जलद खेळी केली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज फारसे प्रभाव पाडू शकले नाहीत. शेवटच्या षटकांमध्ये किरॉन पोलार्डने 28 चेंडूंमध्ये 43 धावांची नाबाद धडाकेबाज खेळी केली, ज्यात 3 चौकार आणि 4 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. तरीही, त्याला संघाला विजयापर्यंत पोहोचवता आले नाही.
हेही वाचा – Run Out Video : शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी हवी होती एक धाव, अन् फलंदाज धावताना पडला, पाहा VIDEO
फाल्कन्सनने केली दमदार कामगिरी –
अँटिगुआ अँड बारबुडा फाल्कन्सकडून फलंदाजी करताना इमाद वसीमने 27 चेंडूंमध्ये नाबाद 39, तर फॅबियन अॅलनने 20 चेंडूंमध्ये 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. गोलंदाजीत ओबेद मॅककॉयने 4 बळी घेत सामन्याचा नायक ठरला. त्याच्या शानदार गोलंदाजीमुळे फाल्कन्सने हा सामना जिंकून गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले.
सामन्याचा थरार –
सामन्याच्या शेवटच्या षटकात नाइट रायडर्सला विजयासाठी 14 धावांची गरज होती. शमार स्प्रिंगरच्या गोलंदाजीवर पोलार्डने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला, पण त्याआधी चार चेंडू वाया गेल्याने फाल्कन्सने 8 धावांनी बाजी मारली. या विजयामुळे फाल्कन्सने आपली विजयी लय कायम राखली, तर नाइट रायडर्सला पुढील सामन्यात सावरण्याची गरज आहे.





