Mumbai Corona Virus Patient : मुंबईच्या केईएम रुग्णालयात काल दोन कोव्हिड सदृश्य असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अजून आठ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुंबईकरांचे टेन्शन वाढले आहे. या रुग्णांना वेगवेगळ्या व्याधींमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरीही, त्यांचा रिपोर्ट कोव्हिड पॉझिटिव्ह आला आहे. सर्व नागरिकांनी, मुंबईकरांनी सावधगिरी पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केले जात आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही रुग्ण सिंधुदुर्ग आणि डोंबिवली येथील होते. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या ८ रुग्णांना सेव्हन हिल रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, सिंगापूर आणि चीनमध्ये वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येमुळे भारतातील विशेषतः मुंबईसारख्या महानगरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. मात्र या नवीन रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. केईएम रुग्णालयात मृत्यू झालेल्या दोन्ही रुग्णांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून, कोविड प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर आयसोलेटेड पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. महापालिका सज्ज मुंबईत पुन्हा एकदा काही प्रमाणात कोविड-१९ रुग्णांची नोंद होऊ लागली असून महानगरपालिका या स्थितीकडे गांभीर्याने पाहत आहे. सध्या मिळणारे कोविड रुग्ण सौम्य लक्षणाचे असून सर्दी खोकल्याप्रमाणे उपचाराने बरे होत आहेत, कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घ्यावेत, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.