Nylon Manja : नायलॉन मांजाच्या वापरावर न्यायालयाने उचलले कडक पाऊल; दोषी आढळल्यास होणार मोठी कारवाई

Nylon Manja – नायलॉन मांजाच्या वापराविरूद्ध न्यायालयाने कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. वेळोवेळी कडक निर्बंध घालुनही नायलॉन मांजाचा सर्रास वापर अजूनही सुरू असल्याने उच्च न्यायालयाने यात आता दोषी आढळल्यास मोठ्या आर्थिक शिक्षेचा प्रस्ताव ठेवला आहे. नायलॉन मांजाला विरोध करत काही नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
आता, न्यायालयाने देखील ही बाब गंभीरतेने घेत नागरिकांच्या सूचना व हरकती मागवल्या आहेत. नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या मुलांच्या पालकांना आणि विक्री करणाऱ्यांना मोठ्या दंडाची शिक्षा सुनावली जाणार आहे. यासंदर्भात गृह विभागाने सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवले आहे.
नायलॉन मांजा विरोधात नागपूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश पारित करुन 2021 पासून नायलॉन मांजाच्या वापरावर अंकुश ठेवण्यासाठी वेळोवेळी विविध आदेश पारित केले आहेत. मात्र, त्यात फारसा बदल झालेला नाही.
मकर संक्रांतीच्या सणाला अनेक ठिकाणी पतंगोत्सव साजरा केला जातो, मात्र गेल्या काही वर्षात या पतंगांसाठी नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने अनेक अपघात घडत आहेत. नायलॉन मांजामुळे नागरिकांच्या शरीरावर गंभीर जखमा होत असून गळा चिरल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत.
त्यामुळे, एखादा अल्पवयीन मुलगा नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास त्याच्या पालकांना न्यायालयात 50 हजार रुपये दंड स्वरूपात जमा करण्याचा, तर प्रौढ व्यक्ती आढळल्यास त्यास 50 हजार रुपये दंड करण्याचे आदेश देण्याचा प्रस्ताव आहे.
तसेच, जर एखाद्या विक्रेत्याकडे नायलॉन मांजाचा साठा आढळला तर त्याला अडीच लाख रुपये दंड स्वरूपात जमा करण्याची प्रस्तावित शिक्षेची तरतुद असणार आहे. यावरती, सुनावणी येत्या 5 जानेवारी 2026 रोजी उच्च न्यायालयाने निश्चित केली आहे.
त्यामुळे, या प्रस्तावित शिक्षे संदर्भात कुणाला सूचना किंवा आक्षेप असतील तर त्यांनी सुनावणीच्या तारखेला हजर राहून आपले निवेदन सादर करावे, असे न्यायालयाने आवाहन केले आहे.





