न्यायालयाचा आदेश ! मोठ्या आवाजात गाणी लावल्यास बसमधून उतरवणार

बंगळुरू – कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाइलवर मोठ्या आवाजात अर्थात स्पिकर लावून गाणी ऐकण्यास बंदी घालण्यात आली आहे. तेथील उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात न्यायालयात एक तक्रार याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेत बसमधील आवाजाच्या त्रासावर निर्बंध आणण्याची मागणी केली होती. मोठ्या आवाजात गाणी आणि व्हिडिओ प्ले करण्यासाठी मोबाइल फोनचा वापर प्रतिबंधित करण्यात यावा, असे त्यात म्हटले होते.
ही बाब विचारात घेऊन, बसमधील अधिकाऱ्यांनी लोकांना जास्त आवाजात गाणी वाजवू नये आणि सहप्रवाशांना त्रास होऊ नये अशी विनंती करावी असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. जरएखाद्या प्रवाशाने सूचना ऐकल्या नाहीत तर अधिकारी प्रवाशाला बसमधून उतरवू शकतात,असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.




