Raj Thackeray – उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, की काही खायला घालू नका. तरीही तुम्ही धर्माच्या नावाने त्यांना खायला देत असाल तर ते चुकीचे आहे. एकदा अशा गोष्टींना सुरुवात झाली की, इतरही तसेच वागणार. मग उच्च आणि सर्वोच्च न्यायालय हवेत कशाला? काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. मराठी माणसाने आंदोलन केले की, त्यांना धक्काबुक्की होते, त्यांनी आंदोलन केले तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. ही लोढा-बिढा सारखी माणसं मध्ये येतात. ते काही एका समाजाचे मंत्री नाहीत, त्यांनी देखील न्यायायलयाचा मान राखला पाहिजे. जे लोक हत्यारे घेवून आली होती, त्यांच्यावर देखील कारवाई होणे अपेक्षित आहे, असे म्हणताना मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरेंनी कबुतरखाना प्रकरणावरुन मंत्री मंगलप्रभात लोढा यांना चांगलेच सुनावले. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेची शाखाअध्यक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंबईतील सर्व शाखाध्यक्षांनी या बैठकीला हजेरी लावली. या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी शाखाध्यक्षांना आगामी निवडणूकीच्या दृष्टीकोनातून संवाद साधला. मात्र, यावेळी कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन केले, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. कबुतरखाना संदर्भात विचारणा केली असता, राज ठाकरे म्हणाले की, न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करुनच निर्णय दिला आहे. कबुतरांमुळे कोणकोणत्या प्रकारचे रोग होवू शकतात, हे अनेकवेळा डॉक्टरांनी देखील स्पष्ट केले आहे. असे असताना देखील तुम्ही त्याच गोष्टी करत असाल, तर अशा लोकांवर पोलीसांनी कारवाई करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. हाच सर्वात मोठा विरोधाभास आहे राज ठाकरेंना स्वातंत्र्यदिनी कल्याण-डोंबिवलीमध्ये मांसबंदी आणि कत्तलखाना बंदीवरुन विचारणा केली असता ते म्हणाले की, ‘मी आमच्या लोकांना सांगितले आहे की ते चालू ठेवा. महानगरपालिकेला या सर्व गोष्टींचा अधिकार नाही. कुणी काय खावे आणि कुणी खाऊ नये, याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकेने करु नयेत. एका बाजूने आपण स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करायचा आणि साधे खाण्याचे स्वातंत्र्य नाही? स्वातंत्र्यदिनाच्यादिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय तर हाच सर्वात मोठा विरोधाभास आहे. कुणाचे काय धर्म आहेत आणि कुणाचे काय सण आहेत, याच्याप्रमाणे कुणी काय खावे, ही गोष्ट सरकारने सांगू नये’, असे म्हणत राज ठाकरे या निर्णयावर चांगलेच संतापले.