पुणे : वयोवृद्ध आई-वडिलांच्या आजारपणासह त्यांच्या औषधोपचारासाठी खर्च होत असला तरी आई-वडीलांसह बायको आणि मुलींची जबाबदारीही पतीची आहे. पती आपल्या जबाबदार्यांपासून दूर जाऊ शकत नाही. पतीने त्याच्या पत्नीसह मुलांचा सांभाळ करणे हे कायदेशीर व नैतिक कर्तव्य असल्याचे नमूद करीत पत्नीसह मुलींना अंतरिम पोटगी देण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. जी. आर. डोरनलपल्ले यांनी दिले. पत्नीला दरमहा दहा हजार रुपये तर दोन्ही मुलीला प्रत्येकी सहा हजार रुपये अंतरीम पोटगी अर्ज दाखल केल्यापासून मुख्य अर्जाचा निकाल लागण्यापर्यंत देण्यात यावे, असे न्यायालयाच्या आदेशात आहे.निरज आणि निरजा यांचा विवाह दि. १३ मार्च २०११ मध्ये झाला. निरज हा सरकारी नोकरी करतो, तर ती गृहिणी आहे. लग्नाच्या वर्षभरानंतर निरजा या गर्भवती राहिल्या. यावेळी, निरज याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ, मारहाण करण्यास सुरवात केली. दि. १० मार्च २०१२ मध्ये निरजा यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. मुलगी झाल्याच्या कारणावरून तिचा छळ करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर पुन्हा मुलगी झाल्याने निरजा हिचा मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरूवात झाली. याखेरीज, तिला सदनिकेसाठी माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा लावण्यात आला. पैसे न आल्याने तिच्यावर घरातील पैसे चोरून माहेरी देत असल्याचा आरोप करण्यात आला. मुलगा न झाल्याच्या कारणावरून तिला घटस्फोट देण्याची मागणी करीत गर्भपात करण्यात आला. त्यानंतर तिला मारहाण करीत घराबाहेर हाकलून दिले. तिने माहेरहून पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचारानुसार तक्रार दाखल केली. यामध्ये तिने अॅड. राहुल तनपुरे व अॅड. राहुल सपकाळ यांच्यामार्फत न्यायालयात अंतरिम पोटगी मागितली होती, त्यांना अॅड. किरण कोल्हे यांनी सहकार्य केले.