Female Serial Killer: महिला सिरीयल किलरला फाशीची शिक्षा; थायलंडमधील न्यायालयाचा आदेश

बँकॉक – थायलंडच्या न्यायालयाने एका ३६ वर्षीय महिलेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात धोकादायक सिरीयल किलर म्हणून तिचे वर्णन केले जात आहे. 14 मित्रांना सायनाइड देऊन त्यांची हत्या केल्याप्रकरणी कोर्टाने सारारत रंगसिवुथापोर्नला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
या महिलेने 2015 पासून आतापर्यंत 14 जणांची हत्या केली आहे. तिच्या मित्राच्या हत्येप्रकरणी तिला शिक्षा झाली आहे. दरम्यान, सारारत रंगसिवुथापोर्न विरुद्ध 13 इतर खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.
2023 मध्ये सारारत रंगसिवुथापोर्न तिची मैत्रिणी सिरिपोर्न खानगावसोबत फिरायला गेली होती. दोघींंनी घाटावरच्या माशांना खाऊ घातला आणि नंतर दोघींनी जेवण केले. खाल्ल्यानंतर काही वेळातच सिरीपोर्नची तब्येत बिघडली आणि ती नदीच्या काठावर पडली. सारारतच्या डोळ्यांसमोर तिच्या मैत्रीणीला त्रास होत होता, मात्र ती केवळ तिच्याकडे पाहत उभी राहीली.
पोलिसांनी सिरीपॉर्नचे पोस्टमॉर्टम केले तेव्हा तिच्या जेवणात सायनाइड दिल्याचे आढळून आले. सिरिपोर्नच्या कुटुंबीयांनी सारारत विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पुरावे गोळा केले आणि मे २०२३ मध्ये तिला अटक केली.
यानंतर सारारतने तिचे भयंकर रहस्य उघड केले. 2015 पासून आतापर्यंत तिने 14 जणांना सायनाइड देऊन ठार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतांमध्ये तिचा माजी प्रियकर, मित्र आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील 12 महिला आणि 2 पुरूष आहेत. या सर्व हत्या पैशासाठी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सारारतला जुगाराचे व्यसन होते.
ती खूप कर्जात बुडाली होती. तिच्यावर क्रेडिट कार्डचे कर्ज होते. ती तिच्या मैत्रिणी आणि ओळखीच्या लोकांकडून पैसे मागायची. लोकांनी तिला पैसे परत मागितले तर ती त्यांना मारायची. पिण्याचे पाणी, अन्न आणि औषधात सायनाइड मिसळून तिने हे गुन्हे केले.
थायलंडच्या पोलिसांनी सांगितले की, सारारतने 15 जणांना विषारी औषधी वनस्पती असलेल्या कॅप्सूल खाऊ घातल्या. मात्र, यातील एक जण बचावला. तिच्यावर सध्या 13 वेगवेगळ्या खुनांचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर एकूण 80 गुन्हे दाखल आहेत.





