कफ सिरपच्या बळींची संख्या १४ वर; केंद्रीय औषध मानक नियंत्रणचे कारवाईचे आदेश

छिंदवाडा – देशभरात विषारी कफ सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यूंचा आकडा वाढत चालला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात ११ आणि राजस्थानमध्ये ३ मुलांचे मृत्यू झाल्यानंतर प्रशासन आणि केंद्र सरकारने कारवाई सुरू केली आहे.
केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थाने तमिळनाडू फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनला ‘कोल्डरिप’ सिरप तयार करणा-या स्रेसन फार्मासिटयूकल कंपनीविरुद्ध गंभीर गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
छिंदवाडा जिल्ह्यात कोल्डरिप सिरप दिल्यानंतर ११ मुलांचा मृत्यू झाला. प्रशासनाने कडक कारवाई करत डॉ. प्रवीण सोनी याला अटक केली. त्याने मृत मुलांपैकी अनेकांना हे सिरप लिहून दिले होते.
डॉ. सोनी आणि स्रेसन फार्मासिटयूकलच्या संचालकांविरुद्ध ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स अॅक्टच्या कलम २७(अ) तसेच बीएनएस कलम १०५ आणि २७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मध्य प्रदेश सरकारने कोल्ड्रिफ कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घातली आहे. कोल्डरिप सिरपमध्ये ४८.६% डायएथिलीन ग्लायकोल आढळले, जे अत्यंत विषारी आणि प्राणघातक रसायन आहे.
छिंदवाडा जिल्हाधिकारी हरेंद्र नारायण यांनी सांगितले की, सर्व नमुने आणि कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली असून, कंपनीविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे. दरम्यान, सरकारने १४ मृत मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.





