#coronavirus । नियमांचे पालन करणे लहानग्यांच्या हिताचे

पुणे – “लहान मुलांना करोना होत नाही, हा गैरसमज असून शून्य ते 10 वयोगटातील 3.35 टक्के, तर 11 ते 20 वयोगटातील 8.38 टक्के जणांना करोना झाल्याची आकडेवारी आपल्याकडे आहे.
सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आपल्या लहानग्यांच्या हिताचे आहे,’ अशी माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. शैलेश गुजर यांनी दिली.
नारायण पेठेतील भाजप कार्यकर्ते योगेश शांडिल्य-तिवारी यांनी “करोना आणि लहान मुले’ या विषयावर पालकांसाठी वेबिनारचे आयोजन केले होते.
यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य शेखर मुंदडा उपस्थित होते. निवेदक नीलिमा देशपांडे यांनी पालकांचे प्रश्न डॉ. गुजर यांच्यापुढे मांडले.
“शून्य ते 10 वयोगटापर्यंत अनेक लसी बालकांना दिल्या जात असल्याने बालकांची प्रतिकारशक्ती चांगली असते. तुलनेने 10 वर्षांनंतर करोना होण्याची शक्यता जास्त असते.
बालदमा असणाऱ्या आणि त्यासाठी स्टेरॉइडची औषधे किंवा स्प्रे वापरणाऱ्या मुलांना करोना कमी प्रमाणात होतो, ही आश्चर्याची बाब संशोधनातून समोर आली,’ असे डॉ. गुजर यांनी नमूद केले.
मुलांना कोविड होऊन गेल्यानंतर 20 दिवस ते 1 महिन्याने होणारे आजार म्हणजे “मल्टिसिस्टिम इन्फ्लमेंटरी सिंड्रोम’ आहे. यामध्ये हृदय, फुफ्फुसे यांच्या संसर्गाचा किंवा फीट्स येण्याचा प्रकार होऊ शकतो.
त्यावेळी आयसीयू लागू शकतो. त्यामुळे पालकांनी मुलांची काळजी घ्यावी. घरामध्ये करोना पालकांकडूनच येण्याची शक्यता अधिक असते, असेही डॉ. गुजर म्हणाले.
प्रथिनयुक्त आहार द्या
लहान मुलांना प्रथिनयुक्त आहार देणे सध्या गरजेचे आहे. त्यामध्ये कडधान्य, डाळी, अंडी, भाज्या टाकून केलेले पुलाव, पुरणपोळी सारखे पदार्थ मुलांना खायला द्यायला हवेत. वय वर्षे 10 पुढच्या मुलांनी इन्फ्ल्युएन्झा आणि “एमएमआर’ची लस घेतली तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, अशी माहिती डॉ. गुजर यांनी दिली.




