CoronaNews : मुंबईत परिस्थिती हाताबाहेर; ‘लॉकडाऊन’बाबत पालकमंत्र्यांचं मोठं विधान

मुंबई – करोना नियम पाळण्यासंदर्भात लोक ऐकत नाहीत. मी दररोज लोकांमध्ये जावून आवाहन करतोय. पुढील दोन दिवस सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे सांगत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लाकडाऊन लावावाच लागणार असल्याचा अखेरचा इशारा दिला आहे. तसेच यापुढे लावण्यात येणारे निर्बंध हे शेवटचे असतील, असंही ते म्हणाले.
दरम्यान कॉंग्रेसची भूमिका लॉकडाऊन लागू नये अशीच आहे, मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर इलाज नाही, अशी हतबलता अस्लम शेख यांनी व्यक्त केली.
मुंबईत लॉकडाऊन लावण्याची सरकारची आणि माझी स्वत:ची मानसिकता नाही. पण जर लोकांच्या जीवाचा प्रश्न आला की आमच्याकडे पर्याय उरणार नाही. मी आज, उद्या दररोज मार्केटमध्ये जाऊन लोकांना नियम पाळण्याचे आवाहन करणार आहे. त्यामुळे लॉकडाऊनसाठी आम्हाला मजबूर करू नका असं आवाहनही शेख यांनी केलं आहे.
याआधी मुंबईसह ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणची हॉटेल्स बंद ठेवली जातील. मात्र हॉटेल्सना होम डिलिव्हरी किंवा ‘टेक अवे’अर्थात पार्सलची परवानगी असेल. शॉपिंग मॉल्स 15 दिवसांसाठी बंद ठेवले जाऊ शकतात. खासगी आस्थापनांना ‘वर्क फॉर्म होम’ची सक्ती केली जाईल. इतकंच नाही तर रेल्वेसेवा आपत्कालीन कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवली जाईल, असं अस्लम शेख म्हणाले होते.





