मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यात ८४ नवीन कोविड रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मुंबई (३२), पुणे महापालिका (१९), ठाणे महापालिका (१४), पिंपरी-चिंचवड (३), तसेच इतर काही जिल्ह्यांचा समावेश आहे. जानेवारीपासून एकट्या मुंबईत ४११ रुग्ण नोंदवले गेले आहेत. यापैकी मे महिन्यात सर्वाधिक म्हणजेच ४०५ रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत ४६७ रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण ७ मृत्यू कोविडशी संबंधित असून हे रुग्ण आधीपासूनच विविध गंभीर आजारांनी ग्रस्त होते. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये काहींना मूत्रपिंड विकार, मेंदूविकार, मधुमेह, फुफ्फुसाचे विकार आणि इतर सहव्याधी होत्या. कोविडचे रुग्ण तुरळक प्रमाणात आढळत असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. तर, जानेवारी २०२५ पासून राज्यभरात एकूण १०,३२४ कोविड चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ६८१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी आजअखेर २०७रुग्ण बरे झाले आहेत. कोविड रुग्णांमध्ये बहुतेक सौम्य लक्षणे दिसून येत आहेत आणि सर्व उपचार व तपासणीची सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, कोविडचा प्रादुर्भाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्ये व काही देशांमध्येही पुन्हा दिसून येत आहे. त्यामुळे खबरदारी घेतल्यास परिस्थिती हाताळणे शक्य असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू न जाता लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करून उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे, यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी म्हटलं आहे की, दिल्लीमध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे, मात्र काळजी करण्याचं काही कारण नाही, रुग्णालय आणि सरकार अलर्ट मोडवर आहेत. सध्या स्थितीमध्ये दिल्लीत 19 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार रुग्णालयात सुरू आहे, तर बाकी सर्व रुग्णांना घरीच क्वॉरटांईन करण्यात आल्याची माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.