करोना “स्ट्रेन’चा पुण्याला धोका नाही; पण…

करोनाच्या वेगळ्या विषाणूच्या संसर्गाची शक्यता कमी, तरीही सुरक्षा बाळगावीच
पुण्यात ब्रिटनहून थेट प्रवासी उतरत नाहीत : युरोपातील प्रवाशांचे 14 दिवस विलगीकरण
पुणे – इंग्लंडमध्ये सापडलेल्या करोनाच्या वेगळ्या विषाणूने अर्थात “करोना स्ट्रेन’ने हाहाकार माजवला आहे. मात्र, या विषाणूचा फारसा धोका पुणेकरांना नसल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
करोनाच्या नव्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतासह सुमारे 13 देशांनी ब्रिटनला जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत. आठवडाभरासाठी ही बंदी असणार आहे. लंडन आदी भागातून पुण्यात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. याशिवाय करोनाचा महाराष्ट्रातील पहिला रुग्णही पुण्यात आढळला होता. त्यामुळे साहजिकच परदेशांतून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांकडे सगळ्यांचे जास्त लक्ष असणार हे निश्चित!
करोना काळात देखील पुणे विमानतळ आणि रेल्वे स्थानकावर तसेच मुंबई महामार्गावर प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग केले जात होते. तर, संशयित आढळणाऱ्या व्यक्तींचे तातडीने विलगीकरण केले जात होते. सध्याच्या करोनाच्या कहरानंतर या व्हायरस प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. त्यातून राज्यभरात रात्रीची संचारबंदी लागू केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर त्याचा संबंध ब्रिटन येथे सापडलेल्या व्हायरसशी जोडला जात आहे. पुन्हा एकदा अस्थिरतेचे वातावरण निर्माण होईल की काय, अशी भीती अनेकांना वाटू लागली आहे.
ब्रिटनहून थेट पुण्यात एकही विमान येत नाही. मुंबईतच ही सगळी विमाने उतरतात, त्यामुळे थेट पुण्यात येणाऱ्यांची संख्या नाही. तसेच पुण्यातील नागरिक जे मुंबई विमानतळावर उतरतात त्यांची आरटी-पीसीआर बंधनकारक आहेच. याशिवाय त्यांना संस्थात्मक विलगीकरण सक्तीचेच असल्याने तशी काळजी घेतली जात आहे. त्यामुळे पुण्यात याचा थेट परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. पुण्यात फारसा धोक नसला, तरीही नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा प्रामुख्याने अवलंब करावा.
– डॉ. संजीव वावरे, सहआरोग्य प्रमुख, मनपा
पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमाने जी येतात, ती बहुतांश दुबईहून आलेली असतात. अन्य विमाने फारशी नाहीत. शिवाय करोनामुळे विमानसेवा अजून पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे ब्रिटन येथे सापडलेल्या व्हायरसचा कोणताही फरक पडणार नाही. तरीही, सुरक्षेबाबत सर्वतोपरी उपाययोजना विमानतळ प्रशासनाकडून केली जात आहे.
– कुलदीप सिंग, संचालक, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ





