Pune Airport: पुणे विमानतळाची कार्गो वाहतुकीत झेप
Pune Airport:

देशांतर्गत कार्गोमध्ये ४३.५ टक्के वाढ
आंतरराष्ट्रीय कार्गो तीन पटींहून अधिक
Pune Airport: पुणे शहर आणि जिल्ह्यातील औद्योगिक व व्यावसायिक उलाढालीच्या जोरावर पुणे विमानतळाने कार्गो (मालवाहतूक) क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.
मागील आठ महिन्यांत (जानेवारी ते ऑगस्ट २०२६) पुणे विमानतळावरून ४५ हजार ५०.७ मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली असून, वर्षीच्या तुलनेत मालवाहतुकीत ४३.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. दे
शांतर्गत वाहतूक वाढली असतानाच, आंतरराष्ट्रीय कार्गो वाहतूक ६२.४ टनांवरून थेट २२८.७ टनांवर पोहोचली आहे. ही वाढ तीन पटींहून अधिक असून, पुणे विमानतळ व्यापारी मालवाहतुकीचे मुख्य केंद्र बनत आहे.
गतवर्षी (२०२५) याच काळात ३१ हजार ३०३.७ मेट्रिक टन असलेली वाहतूक यंदा १३ हजार ७४७ मेट्रिक टनांनी वाढली आहे. पुण्याच्या आर्थिक आणि औद्योगिक क्षमतेचे सकारात्मक उदाहरण असून, विमानतळ आता देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन ठरत असल्याचा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
पुणे हे ऑटोमोबाइल, आयटी, औषधनिर्माण आणि तंत्रज्ञान क्षेत्रांचे प्रमुख केंद्र असल्याने येथे हवाई कार्गोची मागणी वेगाने वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विमानतळांच्या आधुनिकीकरणामुळे पुण्यासारख्या औद्योगिक शहरांना मोठा फायदा होत आहे.
विमानतळ केवळ प्रवाशांसाठी नसून व्यापार, लॉजिस्टिक्स आणि गुंतवणुकीला चालना देणारे माध्यम बनावे, यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून (AAI) येथील सुविधा अधिक सक्षम केल्या जात असून, या वाढीमुळे महाराष्ट्रातील प्रमुख एव्हिएशन आणि लॉजिस्टिक्स हब म्हणून पुण्याचे स्थान अधिक मजबूत होणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
* देशांतर्गत कार्गो : गतवर्षी ३१,२४१.३ मेट्रिक टन. यावर्षी ४४,८२२ मेट्रिक टन (४३.५ टक्के वाढ).
* आंतरराष्ट्रीय कार्गो : गतवर्षी ६२.४ मेट्रिक टन. यावर्षी २२८.७ मेट्रिक टन (तीनपट वाढ)
* विक्रमी महिने : मे – ६,१४७.८ टन आणि ऑगस्ट – ६,०४६.८ टन (दोन्ही महिन्यांत ६ हजार मेट्रिक टन)





