Pune District : वाल्हे बाजारात कोथिंबीर ६० रूपये जुडी भाव; आठवठ्याचे गणित कोलमडले : ग्राहकांना झळ
Pune District : अन्य पालेभाज्यांच्या भावात मोठी भाववाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनाही अपेक्षित फायदा मिळत नसल्याचे चित्र आहे.

वाल्हे : मागील दोन महिन्यांपासून उष्णतेत वाढ होत असल्याने पिकांवर यांचा मोठा परिणाम होत आहे. पिकांचे उत्पादन घटत असल्याने वाल्हे (ता. पुरंदर) येथील मंगळवारच्या आठवडे बाजारात कोंथीबिरची जुडी ६० रूपयांवर पोहोचली आहे. अन्य पालेभाज्यांच्या भावात मोठी भाववाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसली आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनाही अपेक्षित फायदा मिळत नसल्याचे चित्र आहे.
मागील महिन्यांपासून वाल्हे व परिसरात जवळपास ४० अंशांपर्यंत तापमान गेले असल्याने उष्णतेमुळे भाजीपाला पिकांवर ताण येत असून, अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. विशेषतः कोथिंबीर, मेथी, पालक यासारख्या पालेभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी वाल्हे येथील आठवडे बाजारात आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत.
आठवडे बाजारात जवळपास सगळ्याच तरकारीचे दर वाढले होते. आठवडे बाजारात चाकवत, तांदळी, शेपू, पालक, आळू या भाज्याचे ही भाव वाढले होते. तर आजच्या बाजारात ‘मेथी’ विक्रीसाठी उपलब्ध नव्हती. भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी वाढत्या दरांमुळे नाराजी व्यक्त केली. वाल्हे आठवडे बाजारातील भाजीपाला दर खालीलप्रमाणे- शेवगा ८०, टोमॅटो ८०, बटाटा ३०, वांगी ७०, भेंडी ८०, दोडका ८०, फ्लॉवर ६०, पत्ता कोबी ७०, कारले ९०, गवार (गावरान) १००, वाटाणा १२०, वाल १४०, घेवडा ८०, हिरवा मिरची १२०, लिंबू ११०, ढोबळी मिरची ८०.
पालेभाज्या- पालक ४० जुडी.
वाल्हे व परिसरात मागील दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस तापमानात वाढत असल्यामुळे मेथी, कोथिंबीर पालेभाज्यांची मर होत असून, उत्पादनात घट झाली आहे. त्यातच अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने पालेभाज्यांचे उत्पादन कमी झाले आहे. भाव वाढले तरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. उष्णतेमुळे पिकांना वारंवार पाणी द्यावे लागत आहे. मजुरी, औषधे व वाहतूक खर्च वाढल्याने मिळणारा दर परवडत नाही.
-तानाजी भुजबळ, कोथिंबीर उत्पादक, वाल्हे.
हेही वाचा : Financial fraud : मुदत ठेवींमध्ये अनियमितता कोट्यवधी रुपयांचा फटका





