Copa America 2024 (Quarter Final) : ब्राझीलचे आव्हान संपुष्टात, उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेकडून पराभवाचा धक्का…

Copa America 2024 (Uruguay Vs Brazil) – व्हिनिशियस ज्युनियरच्या अनुपस्थितीचा ब्राझीलला मोठा फटका बसला आणि उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उरुग्वेकडून पराभव पत्करावा लागल्याने ब्राझीलचे कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. नियमित वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये उरुग्वेने ४-२ अशी सरशी साधली. त्यामुळे १०व्यांदा कोपा अमेरिका जिंकण्याचे ब्राझीलचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकणार नाही.
यंदाच्या स्पर्धेत दोन वेळा पिवळे कार्ड मिळाल्याने व्हिनिशियसला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत खेळता आले नाही. त्याच्या अनुपस्थितीत १७ वर्षीय प्रतिभावान आक्रमकपटू एन्ड्रिकला सुरुवातीपासून खेळण्याची संधी मिळाली. मात्र, अतिशय आक्रमकपणे खेळणाऱ्या उरुग्वेसमोर त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही.
या सामन्यात तब्बल ४१ फाऊल झाले, ज्यापैकी २६ उरुग्वेने, तर १५ ब्राझीलने केले. तसेच ब्राझीलचा आक्रमकपटू रॉड्रिगोला धोकादायक पद्धतीने पाडल्यामुळे उरुग्वेच्या नाहितान नान्डेझला ७४व्या मिनिटाला लाल कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे उर्वरित सामन्यात उरुग्वेला १० खेळाडूंनिशी खेळावे लागले. मात्र, त्यानंतरही ब्राझीलला उरुग्वेचा भक्कम बचाव भेदता आला नाही.
Wimbledon Open 2024 : पाओलिनीला मिळाला वॉकओव्हर, पहिल्यादांच उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश..
दोन्ही संघांकडून गोलच्या संधी निर्माण करण्यापेक्षा प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचाच अधिक प्रयत्न झाला. त्यामुळे संपूर्ण सामन्यात दोन्ही संघांना मिळून केवळ चार फटके गोलच्या दिशेने मारता आले. निर्धारित वेळेतील निराशाजनक खेळानंतर अखेर सामन्याचा निकाल लावण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. यात उरुग्वेने ४-२ अशी बाजी मारताना उपांत्य फेरी गाठली. उरुग्वेला १९९२ पासून प्रथमच ब्राझीलविरुद्ध सलग दोन सामने जिंकण्यात यश आले आहे. गेल्या वर्षी विश्वचषक पात्रता फेरीतील सामन्यातही उरुग्वेने ब्राझीलला नमवले होते.





