Yamandú Orsi : उरुग्वेच्या अध्यक्षपदी यामान्दू ओरसी यांची निवड

मोन्टेविडीओ : उरुग्वेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीमध्ये डाव्या विचारांचे यामान्दू ओरसी यांची निवड झाली आहे. ओर्सी हे डाव्या विचारांच्या ब्रॉड फ्रंट आघाडीचे उमेदवार होते. उरुग्वे हा दक्षिण अमेरिका खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. उरुग्वेच्या सीमा ब्राझील आणि अर्जेंटिनाला लागून आहेत.
ओरसी यांनी सत्ताधारी नॅशनल पार्टीच्या अल्वारो डेलगाडो यांचा पराभव करून अध्यक्षपदाची शर्यत जिंकली. चार वर्षांनंतर ब्रॉड फ्रंट पुन्हा सत्तेवर आल्याने ओरसीचा विजय उरुग्वेच्या राजकीय पटलावरील महत्त्वपूर्ण बदल दर्शवितो. ब्रॉड फ्रंटने यापूर्वी २००५ ते २०२० ही १५ वर्षे जोस मुजिका आणि तबरे वाझक्वेझ यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षपद भूषवले होते.
यंदाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत, ओरसी यांनी देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे वचन दिले. त्यांनी पगार वाढवण्याची तयारी दाखवली होती. विशेषत: कमी पगाराच्या कामगारांसाठी, त्यांची खरेदी शक्ती, सुखकारक बालपण आणि शिक्षण तसेच तरुण प्रौढांसाठी रोजगार कार्यक्रमांवर त्यांनी भर दिला होता.
दिनांक २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या फेरीच्या मतदानात ओरसी हे आघाडीवर होते, त्यांना ४४ टक्के तर डेलगाडोच्या यांना २७ टक्के मते मिळाली होती. मात्र दोघांनाही ५० टक्के मते न मिळू शकल्याने मतदानाची दुसरी फेरी घेण्यात आली होती.


