‘गांधी’ नावावरून वाद! मनरेगा योजनेतील बदलांविरोधात पुणे काँग्रेस आक्रमक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या जनहितकारी योजनेच्या तरतुदींमध्ये अत्यंत चुकीचे बदल केल्याचा आरोप करत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने शुक्रवारी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले.काँग्रेस प्रणित केंद्र शासनाने आपल्या कार्यकाळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही जनहितकारी योजना निश्चित केली होती.
मात्र केंद्र शासन महात्मा गांधींचे नाव या योजनेतून वगळण्याचे काम करत आहे. याशिवाय या योजनेमधील अनेक हितकारी तरतुदींमध्ये बदल करण्याचे ठरविले आहे, हे अत्यंत निंदनीय आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांना गांधी नावाची ऍलर्जी झाली आहे. झोपेतही त्यांना गांधीच दिसतात.
त्यांना वाटते गांधींचे नाव बदलले, तर भाजपाला वाटणारी भीती कमी होईल; परंतु महात्मा गांधींचे विचार हे सर्व विश्वाने स्वीकारले असून, ते संपविण्याचा कट यशस्वी होऊ देणार नाही, असे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले.माजी आमदार रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड यांचीही भाषणे झाली. या वेळी अजित दरेकर, लता राजगुरू, सुनील शिंदे, प्राची दुधाने आदी उपस्थित होते.





