Pune News – शहरात गॅस सिलिंडर विषयक समस्या वाढत असताना याची झळ हाटेल, खानावळ व्यावसायिकांना बसत आहे, व्यावसायिक सिलिंडर पुरवठा बंद करण्यात आलेला असताना शासनाने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरामध्येही अचानक मोठी वाढ केली आहे तसेच गॅस सिलिंडर नोंदणीचा कालावधी सुद्धा वाढविला आहे. सिलिंडरसाठी मोठी गैरसोय सुरू झालेली असताना नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याच मुद्यावर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शासनाच्या विरोधात स्वारगेट येथे आंदोलन केल्याने विरोधकांमुळे सिलिंडर समस्येचा मुद्द चांगलाच पेटला आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणाऱ्या शासनाने मोठ्या प्रमाणात गॅस सिलिंडर दरवाढ करीत जनतेचा विश्र्वासघात केल्याची टीका करीत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शासनाच्या विरोधात स्वारगेट येथे आंदोलन करण्यात आहे. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन करण्यात आले, ते म्हणाले की, महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे आधीच कठीण झाले असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एलपीजी गॅसच्या किंमती वाढवून लुट सुरू केली आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती वाढल्या तरी त्याचा बोजा सामान्य जनतेवर पडू दिला नाही. सबसीडी देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाहीत. आताच्या सरकारमुळे मात्र मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या आंदोलनात माजी आमदार दिप्ती चवधरी, नगरसेवक प्रशांत जगताप, विशाल मलके, अश्विनी लांडगे, दिपाली डोख, सुनिल शिंदे, उपाध्यक्ष अजित दरेकर, प्राची दुधाणे, भरत सुराणा, नुरूद्दीन सोमजी, बाळासाहेब अमराळे, राज अंबिके, द. स. पोळेकर, संदिप मोकाटे, रवि ननावरे, कृष्णा सोनकांबळे, सुरेश चौधरी, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, अनुसया गायकवाड, सिमा सावंत, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, सुंदर ओव्हाळ, ब्लॉक अध्यक्ष रमेश सोनकांबळे, अक्षय माने, संजय मोरे, राकेश नामेकर, रवि पाटोळे, सचिन सावंत, अनिल धिमधिमे, सागर धाडवे, फिरोज शेख आदी सहभागी झाले होते. गॅस दरवाढ कमी करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले.