पुणे जिल्हा | सर्व क्षेत्रात नाभिक समाजाचे योगदान – वळसे पाटील

मंचर, (प्रतिनिधी) – नाभिक समाज हा आपल्या समाजातील मुख्य घटक असून या समाजाचे योगदान सर्व क्षेत्रात आहे. नाभिक समाजाशी आपली नाळ जुळलेली असून आपल्याला नेहमीच जवळचा असल्याचे मत पूर्वा वळसे-पाटील यांनी व्यक्त केले.
अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील कवयित्री शांता शेळके सभागृहात नाभिक समाज स्नेह मेळावा व गुणवंतांचा सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी पूर्वा वळसे पाटील बोलत होत्या.
कार्यक्रम प्रसंगी शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे,माजी सभापती कैलास बुवा काळे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा सुषमा शिंदे, भाजपचे तालुका अध्यक्ष संदीप बाणखेले, जिल्हा सचिव प्रमोद बाणखेले, गणपतराव क्षीरसागर,रत्नाकर कोऱ्हाळे,शंकरराव रायकर, ह.भ.प. सुरेखाताई शिंदे,
धनेश क्षीरसागर, अशोकराव क्षीरसागर, दत्ता जाधव, सचिन देवडे, सुनील खंडागळे, तेजपाल रायकर, आप्पा खंडागळे, बाळासाहेब खंडागळे, विनायकराव क्षिरसागर,किसनराव कोऱ्हाळे, तुषारजी चव्हाण, उदयजी टक्के आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यात निष्कलंक नेते म्हणून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची ओळख आहे. त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कारखान्याच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. ते त्यांच्या कुटूंबातील कुणालाही अध्यक्ष करू शकत होते.
मात्र त्यांनी घरातल्या कुणालाही हे पद न देता दुसऱ्यांना संधी दिली. त्यामुळे त्यांनी कधीही घराणे शाहीचे राजकारण केले नाही. आजकाल कोणीही उठतो व तुम्ही ३५ वर्षात काय विकास केला. हे त्यांना विचारतो मात्र वळसे पाटलांकडे कुठले काम घेऊन जा ते तात्काळ मार्गे लागतात.
मंत्रालयात इतर मंत्री त्यांना भेटायला येतात. नवीन आमदार झालेला मंत्रालयात गेला तर त्याला दोन दिवस केबिनच्या बाहेर उभे राहावे लागते. असे भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.
समाजाशी भावनिक नाते…
नाभिक, परीट समाजाची आमच्या कुटुंबाचे भावनिक नाते असून लहानपणापासून या समाजाबरोबर मी वाढले, राहिले असल्याने हा समाज मला नेहमी जवळचा वाटला आहे. असे किरण वळसे पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी गणपतराव क्षिरसागर,सचिन देवडे, प्रसाद चव्हाण यांची भाषणे झाली. मेळावा यशस्वी करण्यासाठी रत्नाकर कोऱ्हाळे, सुरेशराव क्षीरसागर, अर्जुनराव शिंदे, संतोष बिडवे,सुनील कोऱ्हाळे यांनी मेहनत घेतली. गणपतराव क्षिरसागर यांनी प्रास्ताविक व मयूर सरडे यांनी सूत्रसंचालन केले.





