पुणे जिल्हा | ज्येष्ठांसाठी विरंगुळाभवन बांधणार – वळसे पाटील

मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्यात ज्येष्ठांसाठी विरंगुळाभवन बांधून दिले जाईल. असे आश्वासन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात दिले.
आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक संघ व डी. जी. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जेष्ठ नागरिक दिन कवयित्री शांता शेळके सभागृह तंत्रनिकेतन महाविद्यालय अवसरी खुर्द येथे संपन्न झाला. जागतिक जेष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने तालुका पातळीवर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष अरुण रोडे होते. कार्यक्रमांमध्ये डॉक्टर संजय कळमकर यांनी ज्येष्ठांचे जीवन आनंदित कसे करता येईल. यासाठी हसत खेळत अतिशय उत्साहवर्धक मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे माधवबागचे मिलिंद सरदार यांनी ज्येष्ठांनी आरोग्याबाबत कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष ए. एफ. इनामदार यांनी केले.
तर स्वागत ज्येष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष सखाराम भालेराव यांनी केले. कार्यक्रमासाठी किरणताई वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, फेस्कामचे सचिव चंद्रकांत महामुनी, पुणे प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष हनुमंत कुंभार, एकनाथ वाळुंज,
सचिव कोषाध्यक्ष देवराम नाबगे, विष्णूकाका हिंगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दशरथ भालेराव, सचिवसोपानराव नवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तालुक्यातून सुमारे दोन हजार ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
त्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण लक्षणिय होते. ए. एफ. इनामदार यांची पुणे प्रादेशिक फेस्कॉमच्या उपाध्यक्षपदी तसेच सखाराम भालेराव यांची जनकल्याण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.





