पुणे जिल्हा | आंबेगाव-शिरुरला वळसे पाटील यांच्या माध्यमातून विकासाचे नेतृत्व

मंचर,(प्रतिनिधी) – माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर नागरिकांचा विश्वास आहे. दोन ते अडीच कोटी महिला-भगिनींना या योजनेचा फायदा होणार आहे.
ही योजना महिलांच्या सबल आणि सक्षम करण्यासाठी सुरू राहील. आंबेगाव-शिरुरला दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून विकासाचे नेतृत्व मिळाले आहे. ते विधिमंडळात अतिशय यशस्वी जबाबदारी पार पाडतात. त्यांना राज्यात एक नंबर मतदानाने निवडून द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवार, दि.१८ रोजी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर, म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील,
माजी आमदार पोपटराव गावडे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे, महिला अध्यक्षा सुषमा शिंदे यांच्यासह पक्षाचे मान्यवर उपस्थित होते. अजित पवार पुढे म्हणाले की, सध्या आम्ही फक्त विकासाच बोलायचं ठरवलं आहे.
महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांसाठी पैशाची मागणी केल्यानंतर ६ हजार कोटीचे फाईलवर सही करून ते पैसे वर्ग केले. एक कोटी ८ लाख महिलांच्या खात्यावर पैसे गेले आहेत.
रक्षाबंधन आधी दीड कोटी महिलांच्या खात्यावर सन्मान निधी हस्तांतरित होईल.शेतकऱ्यांसाठी ७:३० एचपी मोटरपर्यंत लाईट बिल माफ केले आहे. ते इथून पुढे चालू राहील. पुढच्या सात ते आठ महिन्यात दिवसा वीज देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मागेल त्याला सोलर पंप दिला जाईल. सूत्रसंचालन मयूर सरडे आणि निलेश पडवळ यांनी केले. आभार विष्णूकाका हिंगे पाटील यांनी मानले.
मागील वेळी काही गोष्टी चुकल्या मान्य केल्या. आता सध्या कांदा, टोमॅटो ला चांगला भाव मिळत आहे. कांद्याची निर्यात बंद करायची नाही. असं आम्ही केंद्र सरकारला सांगितले आहे. डीपीडीसी बैठकीत मी बोलू देत नाही असं म्हणतात. परंतु सर्वांना बोलू दिलं जातं. केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार आले आहे. त्यामुळे आपणही महायुतीचे सरकार राज्यात आणले पाहिजे.
आपल्या ताब्यातील संस्था अतिशय उत्कृष्टपणे चालतात. पुणे जिल्हा बँक चांगली चालते. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने चांगला दर दिला आहे. घोडगंगा बंद पडला तर म्हणतात दादाने बंद पाडला, मी कशाला बंद पाडू. व्यंकटेश कृपा बरा नाही बंद पडला.
यांना कारखाना चालवता येत नाही आणि दुसऱ्याला दोष देतात. आम्ही विकासाच राजकारण करतो. लोकसभेसारखा दणका देऊ नका. मी हात जोडून विनंती करतो. आमचे काळ्याचे पांढरे झाले कव्हर दम धरायचा. आपण एका परिवारातले आहोत. आपल्या ताब्यातील संस्था चांगल्या चालवत आहोत. अजित पवार, उपमुख्यमंत्री.





