पुणे जिल्हा : बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीचा वळसे पाटील यांना पाठींबा

मंचर – प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षाने आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना एकमुखी पाठिंबा दिल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
मंचर येथे झालेल्या पत्रकार परिषदेला प्रहार जनशक्ती पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष जितेंद्र भालेराव, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, तालुका भाजपा पक्षाचे अध्यक्ष संदीप बाणखेले, अमोल अंकुश आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जितेंद्र भालेराव म्हणाले, सध्याच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात इतर ठिकाणी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी वेगवेगळी भूमिका घेतली असेल; परंतु आम्ही त्यांच्याकडे आमची भूमिका मांडली.
आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांची आम्हा प्रहार जनशक्ती पक्षाला, दिव्यांगांना नेहमीच मोठे सहकार्य असते. दोन महिन्यांपूर्वी वळसे पाटील यांच्या माध्यमातून 350 दिव्यांगांना विविध वस्तूंचे वाटप केले गेले. वळसे पाटलांच्या कार्यालयात दिव्यांगांना कायमच मानाचे स्थान मिळाले आहे. बच्चू कडूंशी झालेल्या विचार विनिमयातून महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना एकमुखी पाठिंबा देण्याचे ठरले.
महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम आम्हाला पसंत नाहीत. त्यांनी देखील आमच्याशी संपर्क साधला; परंतु महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमची कामे करत नाहीत. आम्हाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नाहीत.
विकासाच्या बाजूने जाण्याची आमची, पक्षाची भूमिका आहे. त्यानुसार वळसे पाटील यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील या पुढील काळात आमच्या पक्षाच्या आदिवासी, कातकरी, ठाकर, इतर समाजातील दिव्यांगांसाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देतील. असा आम्हाला विश्वास आहे.





