देवेंद्र शहा यांना विश्वास : निवडणुकीत मेहनत घेतलेल्यांचे आभार मंचर – आंबेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी जरा वेगळी होती. समोरच्या उमेदवाराकडून निवडणूक खालच्या पातळीवर घेऊन जाण्याचे काम झाले; मात्र आपल्या कार्यकर्त्यांकडून कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार झाला नाही. सर्वच मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना 75 हजारांचे मताधिक्य मिळेल व ते विजयी होतील, असा दावा शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी केला. विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवार (दि. 20) सायंकाळी सहा वाजेपर्यंत झाले. त्यानंतर विविध गावचे कार्यकर्ते मतदानाची माहिती देण्यासाठी मंचर येथील सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पूजन कार्यालयात आले होते. त्यावेळी उमेदवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देवेंद्र शहा म्हणाले, कार्यकर्त्यांकडून घेतलेली माहिती आणि प्रत्यक्ष मतदान करतेवेळी उमेदवार दिलीप वळसे पाटील, युवा नेत्या पूर्वा वळसे पाटील किरणताई वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेडे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी विविध गावात मतदान चालू असताना मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर मतदारांमध्ये असलेला उत्साह दिसला. सोमवारी (दि. 18) मंचर येथे झालेल्या सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सांगता सभेत झालेली गर्दीच वळसे पाटील यांचा विजय झाल्याचे सांगून गेल्याचे शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी सांगितले. सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. जिवंत सभा कशी असते. हे यावेळी पहावयास मिळाले. निवडणूक काळात महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे हिने तर स्टार प्रचारक म्हणून काम केले. दररोज सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत ती मतदारांच्या गाठीभेटी घेत मंचर येथे सांगता सभेत तिने केलेले भाषण अनेकांच्या मनाला भावून गेले. तसेच भाजपचे पक्षनिरीक्षक अतुल ब्रह्मभट यांनी वेळोवेळी विविध सूचना केल्या. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे मोलाचे योगदान लाभले. मतदानाच्या दिवशी मी स्वतः चांडोली, कळंब, अवसरी, भोरवाडी, पिंपळगाव, लांडेवाडी, सातगाव पठार, यासह विविध गावातील मतदान केंद्रावर भेट दिली असता मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने मतदान करून घेतले तसेच विविध केंद्रावर महिलांच्या प्रतिसाद मोठा होता. त्यामुळे तालुक्यात वळसे पाटील यांच्या विरोधात उभे असलेल्या उमेदवाराला जनता योग्य तो धडा शिकवेल. असेही देवेंद्र शहा म्हणाले. निवडणूक कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले, प्रचार केला. तसेच मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात मतदान करून घेतले. शनिवारी (दि. 23) निकाल लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा करू; मात्र कार्यकर्त्यांनी केलेले कष्ट, केलेले काम महत्त्वाचे आहे म्हणून मी त्या सर्वांचे आभार मानतो. -दिलीप वळसे पाटील, महायुतीचे उमेदवार