अभिनेत्री रिया चक्रवर्तीला तूर्तास दिलासा; ‘या’ दिवशी होणार सुनावणी

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर सुमारे एक महिना अटकेनंतर तिला जामीन मिळाला. मुंबई उच्च न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला होता. आता अलीकडेच एनसीबीने रिया चक्रवर्तीच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने सुनावणीस पुढील तारीख दिल्याने रियाला तूर्तास दिलासा मिळाला आहे.
ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीला मिळालेल्या जामिनाविरूद्ध एनसीबीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, एनडीपीएस कायद्याबाबत हायकोर्टाने अनेक टिप्पण्या केल्या आहेत. सीजेआय म्हणाले की, तुम्ही फक्त टिप्पण्या विरोधात येथे आला आहात, तर जामीन रद्द करण्याची मागणी तुम्ही का करत आहात?.
यावर तुषार मेहता म्हणाले, या याचिकेमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्हाला परवानगी हवी आहे. ही मागणी मान्य करत न्यायालयाने पुढील तारीख सोमवारी म्हणजे 22 मार्च रोजी दिली. वास्तविक, या प्रकरणात चौकशी सुरू असताना एनसीबीने विशेष एनडीपीएस न्यायालयात आपले आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात रियासह 33 जणांवर आरोप केले गेले आहेत.





