Parad Shivling : जगातील सर्वात मोठ्या 5211 किलो वजनाच्या पारद शिवलिंगाची हरिद्वारमध्ये प्राणप्रतिष्ठा
Parad Shivling : दोन हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती; अध्यात्म, विज्ञान आणि मानवकल्याणाचा संदेश

Parad Shivling : हरिद्वार येथील श्री साई शिव गंगा धाममध्ये जगातील सर्वात मोठे मानले जाणारे ५२११ किलो वजनाचे पारद शिवलिंग भव्य धार्मिक विधी आणि वैदिक मंत्रोच्चारांच्या साक्षीने प्रतिष्ठापित करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास देशभरातील दोन हजारांहून अधिक भाविक, संत-महंत, साधक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
ध्यान गुरु रघुनाथ येमुल गुरुजी यांनी सुमारे दहा वर्षांच्या अखंड साधना, संशोधन आणि पारद विज्ञानाच्या सखोल अभ्यासातून या विशाल पारद शिवलिंगाची निर्मिती केली आहे. शिवलिंगाच्या निर्मितीसाठी पारा, सोने, चांदी आणि १०८ प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या अर्कांचा वापर करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
आध्यात्मिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते, हे शिवलिंग भारतीय अध्यात्म, ध्यान परंपरा आणि पारद विज्ञानाचे अद्वितीय प्रतीक असून जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग मानले जात आहे. या प्रकल्पासाठी गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या परंपरेची प्रेरणा, गिरनारचे पूज्य पीर योगी महंत सोमनाथ बापू यांचे आशीर्वाद तसेच पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर बोलताना रघुनाथ येमुल गुरुजी म्हणाले, “हे शिवलिंग केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून ध्यान, आत्मचिंतन आणि सकारात्मक चेतना जागृत करणारे आध्यात्मिक केंद्र आहे. या माध्यमातून मानवकल्याण आणि विश्वशांतीचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचेल.”
या सोहळ्यास खासदार राघव चड्ढा, साध्वी ऋतंभरा, जगद्गुरू शंकराचार्य स्वामीजी महाराज, श्री सुधांशुजी महाराज, स्वामी कैलाशानंद गिरीजी, स्वामी अवधेशानंद गिरीजी, स्वामी रविंद्र पुरीजी, राज्यमंत्री नितीन गौतम यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. उद्योगपती व समाजसेवक राजीव बन्सल यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
समारोपावेळी ‘ध्यानातून शांती, शांतीतून सद्भाव आणि सद्भावातून विश्वकल्याण’ हा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी या सोहळ्याचे वर्णन अध्यात्म, विज्ञान, सेवा आणि मानवकल्याणाचा संगम घडविणारा ऐतिहासिक उपक्रम, असे केले.




