“विजेच्या धक्क्याची अफवा, प्रमाणापेक्षा जास्त गर्दी… ; मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ जणांचा मृत्यू

Mansa Devi Haridwar Stampede। उत्तराखंडमधील पवित्र शहर हरिद्वार त्याठिकाणच्या मनसा देवी मंदिरात मोठ्या प्रमाणत चेंगराचेंगरीची माहिती समोर आली आहे. चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य मंदिराकडे जाणाऱ्या मंदिर मार्गाच्या पायऱ्यांवर ही चेंगराचेंगरी झाली. या अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीने नेमका हा प्रकार कसा घडला याविषयी माहिती देताना,”अचानक मोठी गर्दी झाली अन् त्यातून ही दुर्घटना झाली असल्याचे म्हटले आहे.
उत्तराखंडमधील हरिद्वार याठिकाणी मानसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या बिहारमधील एका व्यक्तीने एका वृत्तसंस्थेला माहिती देताना, ‘त्याठिकाणी खूप गर्दी होती. या प्रक्रियेत मी तिथे पडलो आणि तिथे अनेक लोक जखमी झाले. मी मानसा देवीकडे जात होतो. त्याठिकाणी अचानक मोठी गर्दी झाली. चेंगराचेंगरीत सर्व लोक पडले, या दरम्यान मी पडलो आणि माझा हात तुटला.’अशी माहिती दिली.
एसएसपी काय म्हणाले? Mansa Devi Haridwar Stampede।
या अपघाताची माहिती देताना एसएसपी प्रमोद सिंह डोवाल यांनी, ‘आम्हाला रात्री ९ वाजता पोलिस नियंत्रणातून ही माहिती मिळाली की मानसा देवी मुख्य रस्त्यावर खाली काही लोक जखमी झाल्याची बातमी आली आहे. जखमींना पोलिस दलाने तात्काळ रुग्णालयात आणले. सुमारे ३५ लोकांना येथे आणण्यात आले होते. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. आतापर्यंत यामागील मुख्य कारण समोर आले आहे. मंदिर रस्त्यापासून सुमारे १०० मीटर खाली पायऱ्यांजवळ विजेचा धक्का लागल्याच्या अफवेमुळे चेंगराचेंगरी झाली. आम्ही याची नेमकी कारणे शोधत आहोत. आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहोत. ‘
विद्युत तार तुटल्याची अफवा पसरवली
डीएम मयूर दीक्षित यांनी अपघाताविषयी माहिती देताना, ‘फोटो आणि व्हिडिओंद्वारे आम्हाला आढळले की कोणीतरी विजेचे तार तुटल्याची अफवा पसरवली, तर जखमी किंवा मृतांना पाहून आम्हाला असे कोणतेही संकेत मिळाले नाहीत. चेंगराचेंगरीला कारणीभूत असलेल्या अफवा कोणी पसरवल्या याची आम्ही चौकशी करू आणि कॅमेरे आणि इतर मार्गांनी चौकशी करण्यासाठी दंडाधिकारी चौकशी स्थापन केली जाईल. ६ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. ‘
मुख्यमंत्री धामी यांनी पोस्ट केले Mansa Devi Haridwar Stampede।
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट केले आणि लिहिले की, ‘हरिद्वारमधील मनसा देवी मंदिर रस्त्यावर चेंगराचेंगरी झाल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. यूके एसडीआरएफ, स्थानिक पोलिस आणि इतर बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आहेत आणि मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. मी या संदर्भात स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात आहे आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. सर्व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मी माता राणीकडे प्रार्थना करतो.





