Ganga water: हरिद्वारमधील गंगेचे पाणी पिण्यायोग्य नाही; उत्तराखंड प्रदूषण नियंत्रण मंडळाची माहिती

Haridwar Ganga water – हरिद्वार मध्ये वाहणाऱ्या गंगेचे पाणी पिण्यासाठी सुरक्षित नसल्याचे उत्तराखंड प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केले आहे. प्रदूषण मंडळाच्या निकषानुसार उत्तराखंड मधील हरिद्वार येथील गंगेचे पाणी ब वर्गात येते आणि ते पिण्यासाठी सुरक्षित नाही. मात्र स्नानासाठी सुरक्षित असल्याचे मंडळाने म्हटले आहे. प्रदूषण मंडळाने हरिद्वारमधून वाहणाऱ्या गंगेच्या पाण्याचे आठ ठिकाणचे नमुने घेऊन त्याची दर महिन्याला चाचणी केली आणि त्यानंतर या संदर्भातील निष्कर्ष जाहीर केले आहेत.
हरिद्वार मधील गंगेच्या पाण्याच्या नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या चाचणीमध्ये हे पाणी ब वर्गात आढळले. नदीच्या पाण्याला पाच वर्गात विभागण्यात येते. अ वर्गातील नदीचे पाणी हे बऱ्यापैकी सुरक्षित मानले जाते. ते शुद्ध करून पिण्यास योग्य मानले जाते. इ वर्गातील पाणी मात्र सर्वात धोकादायक समजले जाते.
उत्तराखंड प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी राजेंद्र सिंग यांनी म्हटले आहे, की केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाण्याची पाच वर्गात विभागणी केलेली आहे. त्यासाठी चार प्रकारचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार पाण्याचा सामू (पीएच पातळी), पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण, जैविक प्राणवायू आणि कोलीफॉर्म बॅक्टेरिया यावरून पाण्याची सुरक्षितता ठरवली जाते. हे निकष लक्षात घेता हरिद्वार मध्ये गंगेचे पाणी स्नानासाठी योग्य आहे. मात्र पिण्यासाठी ते सुरक्षित नाही.
यावर स्थानिक पुजारी उज्वल पंडित यांनी देखील चिंता व्यक्त केली असून गंगेतील वाढत्या प्रदूषणाबाबत उपाययोजनांची गरज असल्याचे म्हटले आहे. मानवी सांडपाणी व केरकचरा यामुळे गंगेचे पाणी प्रदूषित होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, की गंगेत स्नान केल्याने आपल्या शरीरातील अनेक आजार व व्याधी बऱ्या होतात. कर्करोगासारखे आजार यामुळे बरे होतात. आपण असाही दावा करतो की तुम्ही आज गंगेचे पाणी कुपीमध्ये बंद करून ठेवले आणि दहा वर्षांनी ते पुन्हा तपासले तरी देखील त्यामध्ये तुम्हाला अशुद्धता आढळणार नाही. मात्र आता माणसांच्या चुकामुळे आणि केर कचरा तसेच सांडपाण्यामुळे परिस्थिती बदलली आहे. आपण हे सगळे रोखण्याची गरज आहे.




