कॉंग्रेस तेलंगणात टीआरएसशी हातमिळवणी करणार नाही; राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती

हैदराबाद – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्या राज्यात राव यांच्या सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समितीशी (टीआरएस) कॉंग्रेसची हातमिळवणी होण्याची शक्यताही राहुल यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली.
तेलंगणमध्ये पुढील वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कॉंग्रेस पक्ष आतापासूनच सज्ज होत आहे. त्या सज्जतेचा भाग म्हणून कॉंग्रेसने तेलंगणमधील वारंगल येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यामध्ये बोलताना राहुल यांनी राव यांच्यावर टीकेची झोड उठवली.
राव मुख्यमंत्री असल्याप्रमाणे नव्हे; तर एखाद्या राजासारखे वागत आहेत. आंध्रप्रदेशचे विभाजन होऊन स्वतंत्र तेलंगण राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे तेलंगणचा विकास होईल अशी आशा भाबडी जनता बाळगून होती. मात्र, केवळ राव कुटूंबाचीच प्रगती झाली. राव यांनी तेलंगणच्या जनतेच्या आशा फोल ठरवल्या. त्यांच्या पक्षाशी कॉंग्रेसची थेट लढत होईल, असे राहुल म्हणाले. कॉंग्रेस सत्तेवर आल्यास तेलंगणमधील शेतकऱ्यांचे 2 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.





