Rajeev Chandrasekhar : कॉंग्रेसने आंदोलनापूर्वी बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा; राजीव चंद्रशेखर यांची टीका
'नीट'परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणावरून नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या काँग्रेस पक्षावर केरळ भाजपचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

Rajeev Chandrasekhar : ‘नीट’परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणावरून नवी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या काँग्रेस पक्षावर केरळ भाजपचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. दिल्लीत जाऊन आंदोलन करण्यापूर्वी काँग्रेसने आधी केरळमधील गंभीर बनलेला बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
केरळ लोकसेवा आयोगाच्या नियुक्त्यांमधील अनियमिततेचा निषेध करणाऱ्या आंदोलनकर्त्या उमेदवारांची चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील तरुण नोकरीच्या शोधात भटकत आहेत. तरुण हक्काच्या रोजगारासाठी पीएससी परीक्षा देतात, पण त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत.
केरळ हे देशात सर्वाधिक बेरोजगारी दर असलेल्या राज्यांपैकी एक बनले आहे, तरीही राज्यातील सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. मुख्यमंत्री राज्याच्या समस्या सोडवण्याऐवजी दिल्लीला जाऊन फोटो काढण्यात मग्न असल्याचा टोला त्यांनी लगावला. दोन-अडीच महिने झाले तरी यूडीएफ सरकार रोजगार निर्मिती करण्यात अपयशी ठरले आहे.
सरकारने १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतले, तरीही एकही रोजगाराची संधी निर्माण केली नाही, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी आणि सीपीएम केवळ दिल्लीत नाटके करत असून केरळच्या तरुणांच्या हक्कासाठी काहीच करत नसल्याची टीका त्यांनी केली.
नेमॉमचे आमदार असलेल्या चंद्रशेखर (Rajeev Chandrasekhar) यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना भाजपचा १००% पाठिंबा जाहीर केला. तसेच, पुढील आठवड्यात शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन उमेदवारांच्या तक्रारी मांडण्याचे आणि विधानसभेत हा मुद्दा लावून धरण्याचे आश्वासन त्यांनी दिले.






