मणिपूरवरून कॉंग्रेसने केंद्र सरकारला घेरले; अमित शहा, एन.बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यांची मागणी

नवी दिल्ली – मणिपूरमधील अशांत स्थितीवरून कॉंग्रेसने सोमवारी भाजपच्या केंद्र आणि राज्य सरकारांना घेरले. त्या पक्षाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यांचीही जोरदार मागणी केली. मणिपूरच्या मुद्द्यावर कॉंग्रेसने दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष के.मेघचंद्र सिंह सहभागी झाले. त्यावेळी बोलताना रमेश म्हणाले, मागील वर्षीच्या मेपासून मणिपूर जळत आहे.
तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक देशांचे दौरे केले. मात्र, ते अद्याप मणिपूर दौऱ्यासाठी वेळ काढू शकलेले नाहीत. संसदेचे अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याआधी मोदींनी मणिपूर दौऱ्यासाठी वेळ काढावा. त्या दौऱ्यात त्यांनी राजकीय नेते, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि छावण्यांमध्ये आश्रय घेतलेल्या नागरिकांची भेट घ्यावी. मणिपूरमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला त्यांनी भेटावे. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मणिपूरची व्यथा संपूर्ण देशाची व्यथा आहे. त्या राज्यातील हिंसाचारात आतापर्यंत ३०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. तसेच, ६० हजारहून अधिक विस्थापित झाले. त्यातून डबल इंजिन सरकारांचे सपशेल अपयश अधोरेखित होते. त्या अपयशासाठी केंद्रीय गृहमंत्री या नात्याने शहा थेट जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असे आम्हाला वाटते, असे रमेश म्हणाले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मोदी आणि मुख्यमंत्री सिंह यांच्यावर निशाणा साधला. मणिपूरकडे मोदी दुर्लक्ष का करत आहेत? मुख्यमंत्र्यांना पदावर कायम राहण्याचा अधिकार राहिलेला नाही, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.





