काॅंग्रेस अध्यक्ष निवडणुक: बदल हवा असेल तर मला मत द्या, अन्यथा… – शशी थरूर

तिरूअनंतपुरम – कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक हा काही संघर्ष नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपला अध्यक्ष निवडू द्यावा हा आमचा यामागचा संदेश आहे. जर कार्यकर्ते पक्षाच्या स्थितीबाबत समाधानी असतील तर त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना मतदान करावे. जर त्यांना बदल हवा असेल तर त्यांना माझा पर्याय आहे, असे अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार शशी थरूर यांनी म्हटले आहे.
थरूर म्हणाले की, खर्गे हे कॉंग्रेसचा महत्वपूर्ण भाग आहेत व अत्यंत वरिष्ठ नेते आहेत. टॉपच्या तीन नेत्यांमध्ये त्यांचे नाव येते. राज्यसभेतही ते पक्षाचे नेतृत्व करतात. प्रत्येक महत्वाच्या विषयात त्यांचे नाव असते. राजस्थानातही समस्या निर्माण झाली तेव्हा खर्गे यांनाच जयपूरला पाठवण्यात आले होते.
दरम्यान, कॉंग्रेसमध्ये जी पक्षांतर्गत लोकशाही आहे ती अन्य कोणत्या पक्षात नाही असा दावा त्यांनी केला. निवडणुकांची घोषणा झाली तेव्हा मी एक लेख लिहीला होता. त्यात मी मुद्दे मांडले होते. निवडणुका या पक्षासाठी चांगल्या आहेत. का चांगल्या आहेत याची कारणेही मी त्यात मांडली होती असे त्यांनी नमूद केले.





