Shashi Tharoor: काॅंग्रेस नेते शशी थरूर यांची नाराजी दूर? दोन तासांच्या बैठकीत काय झाली चर्चा?
Shashi Tharoor:

Shashi Tharoor: काँग्रेसच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून धुमसत असलेल्या अंतर्गत वादावर अखेर पडदा पडण्याची चिन्हे आहेत. केरळचे दिग्गज नेते आणि खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी संसदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.
खरगे यांच्या दालनात तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीनंतर, “पक्षात सर्व काही आलबेल असून आम्ही एकजुटीने पुढे जात आहोत,” अशी मवाळ भूमिका थरूर यांनी मांडली आहे.
‘त्या’ अपमानामुळे थरूर दुखावले –
गेल्या आठवड्यात कोची येथे झालेल्या काँग्रेसच्या ‘महापंचायती’त शशी थरूर यांना डावलण्यात आल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. राहुल गांधी व्यासपीठावर आले तेव्हा त्यांनी इतर सर्व नेत्यांशी बोलले, मात्र थरूर यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात होते.
इतकेच नव्हे तर, भाषणादरम्यान राहुल गांधींनी अनेक नेत्यांची नावे घेतली, पण समोरच बसलेल्या थरूर यांचा उल्लेख टाळला. या ‘नजरअंदाजी’मुळे थरूर प्रचंड आहत झाले होते. आपला स्वाभिमान दुखावला गेल्याची भावना त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे बोलून दाखवली होती.
#WATCH कांग्रेस सांसद शशि थरूर ने कहा, “मेरी पार्टी के 2 नेताओं, नेता प्रतिपक्ष और कांग्रेस अध्यक्ष के साथ हमारी बातचीत हुई। हमारी बहुत अच्छी, रचनात्मक, सकारात्मक बातचीत हुई। सब ठीक है और हम सब एक साथ मिलकर काम कर रहे हैं। मैं और क्या कह सकता हूं?… मैंने हमेशा पार्टी के लिए… https://t.co/KHJ8Oza58i pic.twitter.com/1DmK8UwmxA
— ANI_HindiNews (@AHindinews) January 29, 2026
‘साहित्य संमेलनाचे’ निमित्त आणि नाराजी –
केरळ विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बोलावलेल्या एआयसीसीच्या (AICC) महत्त्वाच्या बैठकीला थरूर अनुपस्थित राहिले होते. ‘केरळ साहित्य महोत्सवात’ व्यस्त असल्याचे कारण त्यांनी दिले असले तरी, राजकीय वर्तुळात ही त्यांची उघड नाराजी मानली जात होती.
थरूर यांनी स्पष्ट केले होते की, “माझे काही प्रश्न आहेत आणि त्यावर मला बंद दाराआड चर्चा करायची आहे.” त्यानुसारच आजची ही भेट पार पडली.
बैठकीत काय झाले?
दोन तास चाललेल्या या बैठकीत थरूर यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडल्याचे समजते. सूत्रांनुसार, राहुल गांधी आणि खरगे यांनी थरूर यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि आगामी केरळ निवडणुकीत त्यांच्या भूमिकेवर चर्चा केली. बैठकीतून बाहेर पडताना थरूर यांचा चेहरा शांत पण गंभीर होता.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना थरूर म्हणाले, “दोन्ही नेत्यांशी अत्यंत सकारात्मक आणि विधायक चर्चा झाली. काँग्रेस पक्षात आता सर्व काही ठीक आहे. आम्ही सर्वजण एकाच दिशेने पुढे जात आहोत. केरळच्या मुख्यमंत्रीपदाची दावेदारी हा माझ्यासाठी कधीच कळीचा मुद्दा नव्हता.”
काँग्रेससाठी थरूर का महत्त्वाचे?
शशी थरूर हे केवळ केरळमधील नेते नसून त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आणि बौद्धिक ओळख मोठी आहे. दक्षिण भारतात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अशा नेत्याला नाराज करणे काँग्रेसला परवडणारे नाही, विशेषतः केरळ विधानसभा निवडणुका जवळ येत असताना. के.सी. वेणुगोपाल आणि थरूर यांच्यातील अंतर्गत संघर्षावरही या बैठकीत तोडगा निघाल्याचे संकेत मिळत आहेत.
वादाची पार्श्वभूमी –
थरूर आणि हायकमांड यांच्यातील अंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतर थरूर यांनी पंतप्रधान मोदींच्या संविधानविषयक भूमिकेचे केलेले कौतुक यामुळे वाढले होते. तसेच, त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवल्यामुळे पक्षातील एक गट त्यांच्याकडे संशयाने पाहत होता. मात्र, आजच्या बैठकीनंतर हा ‘डॅमेज कंट्रोल’ यशस्वी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, शशी थरूर यांना केरळ निवडणुकीत जाहीरनामा समितीचे अध्यक्षपद किंवा एखादी मोठी जबाबदारी दिली जाते का, याकडे आता राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.





