PM Modi: “काँग्रेस आणि मित्रपक्षांनी नारी शक्तीचा अपमान केला; सीमांकन प्रश्नी जनतेची दिशाभूल”: पंतप्रधान मोदींचा घणाघात
PM Modi:

PM Modi: नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेत मंजूर होऊ न शकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले. “काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सीमांकन (Delimitation) प्रश्नी सातत्याने खोटे बोलत असून, देशात फाटाफुटीचे राजकारण करत आहेत,” असा गंभीर आरोप पंतप्रधानांनी केला.
सीमांकनावरून पसरवला जातोय भ्रम –
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकारने पहिल्या दिवसापासून स्पष्ट केले होते की सीमांकनामुळे कोणत्याही राज्याचे प्रतिनिधित्व कमी होणार नाही किंवा राज्यांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रमाणात बदल होणार नाही. सर्व राज्यांच्या जागा समान प्रमाणात वाढवल्या जातील, असे आश्वासन देऊनही काँग्रेस, डीएमके, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्ष जाणीवपूर्वक अफवा पसरवत आहेत. “काँग्रेसला ब्रिटीशांकडून ‘फोडा आणि राज्य करा’ हा वारसा मिळाला असून आजही ते त्याच धोरणावर चालत आहेत,” असेही ते म्हणाले.
महिला आरक्षणाच्या आड घराणेशाहीचा अडथळा –
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्यानंतर पंतप्रधान भावूक झाले होते. त्यांनी या घटनेचा उल्लेख ‘नारी शक्तीचा अपमान’ असा केला. ते म्हणाले, “या घराणेशाही असलेल्या पक्षांना भीती वाटते की, जर सामान्य घरातील महिलांचे सक्षमीकरण झाले, तर त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल. आपल्या कुटुंबाबाहेरील महिला पुढे जाव्यात, असे त्यांना कधीच वाटत नाही.”
हेही वाचा – होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला; दोन भारतीय जहाजांवर इराणी गनबोट्सकडून गोळीबार
ठळक मुद्दे:
–विधेयक फेटाळले गेल्यावर विरोधी बाकांवर ज्या पद्धतीने आनंद व्यक्त केला गेला, तो महिलांच्या आत्मसन्मानावर झालेला हल्ला आहे.
–२०२९ च्या निवडणुकीत महिलांना हक्क मिळवून देण्याचा हा ‘महा यज्ञा’चा प्रयत्न होता, ज्याचा विरोधकांनी ‘भ्रूणहत्या’ केली आहे.
–काँग्रेस आता स्वतःच्या जीवावर उरलेली नाही. ती प्रादेशिक पक्षांच्या जीवावर जगणारा ‘परजीवी’ (Parasite) पक्ष झाला असून, त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी संपवत आहे.
पंतप्रधानांकडून माता-भगिनींची माफी –
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशातील माता-भगिनींची माफीही मागितली. “अनेक प्रयत्न करूनही आपण नारी शक्ती वंदन अधिनियमात सुधारणा करू शकलो नाही, यासाठी मी तुमची माफी मागतो. आमच्यासाठी राष्ट्रहित सर्वोपरी आहे, पण काही लोकांसाठी पक्षाचे हित हेच सर्वस्व झाले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
लोकसभेत काय घडले?
शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित संविधान दुरुस्ती विधेयक, सीमांकन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक यावर मतदान झाले. विधेयकाच्या बाजूने २९८ तर विरोधात २३० मते पडली. संविधान दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले विशेष बहुमत न मिळाल्याने हे विधेयक फेटाळले गेले. लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ वरून ८१६ पर्यंत वाढवणे आणि त्यात महिलांना ३३ टक्के आरक्षण देणे हा या विधेयकाचा मुख्य हेतू होता. २०११ च्या जनगणनेनुसार हे सीमांकन करण्याचे प्रस्तावित होते.
विपक्ष मात्र 2023 च्या महिला आरक्षण कायद्यानुसार, सध्याच्याच सदस्यसंख्येत आरक्षण लागू करण्याची मागणी करत असून सीमांकन विधेयकाला त्यांचा विरोध आहे.





