Indian Oil Tanker Fired: होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला; दोन भारतीय जहाजांवर इराणी गनबोट्सकडून गोळीबार
Indian Oil Tanker Fired: घटनेनंतर भारत सरकारने तत्काळ पावले उचलत नवी दिल्लीत इराणच्या राजदूताला समन्स बजावले असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Indian Oil Tanker Fired: हॉर्मुझ सामुद्रधुनीत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, इराणच्या गनबोट्सकडून भारतीय ध्वजांकित दोन व्यापारी जहाजांवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जहाजांचे नुकसान झालेले नाही. मात्र, ओमानच्या ईशान्य दिशेला घडलेल्या या घटनेनंतर दोन्ही जहाजांना माघारी फिरावे लागले.
#WATCH | Delhi: Ambassador of Iran to India, Dr. Mohammad Fathali leaves from the Ministry of External Affairs (MEA). More details awaited. pic.twitter.com/HkrEkJKhq1
— ANI (@ANI) April 18, 2026
या घटनेतील एका जहाजाचा समावेश ‘व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर’ (VLCC) प्रकारात होत असून, ही जहाजे प्रचंड आकाराची आणि दीर्घ पल्ल्याच्या कच्च्या तेल वाहतुकीसाठी वापरली जातात. संबंधित जहाजांपैकी एका जहाजात सुमारे २० लाख बॅरल इराकी कच्चे तेल असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर भारत सरकारने तत्काळ पावले उचलत नवी दिल्लीत इराणच्या राजदूताला समन्स बजावले असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, इराणने अमेरिकेच्या नौदलाने त्यांच्या बंदरांवर केलेल्या नाकेबंदीला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा हॉर्मुझ सामुद्रधुनीत वाहतूक रोखण्याची घोषणा केली आहे. याआधी इराणने ही सामुद्रधुनी जहाज वाहतुकीसाठी खुली केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अनेक व्यापारी जहाजांनी मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू केला होता.
मात्र, आज पुन्हा नाकेबंदीची घोषणा झाल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांनी हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न अर्धवट सोडून दिला आहे. या घडामोडींमुळे जागतिक तेलवाहतूक आणि व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





