बंगळुरू – कथित मुडा घोटाळ्यावरून कोंडी झालेल्या कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारने आता भाजपला घेरण्याची तयारी चालवली आहे. त्या सरकारने गुरूवारी करोना संकटकाळातील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय घेतला. करोना संकटावेळी कर्नाटकात भाजपची सत्ता होती. त्या पक्षाचे सरकार असताना औषधे आणि उपकरणांच्या खरेदीसाठी ७ हजार २२३ कोटी रूपये खर्च करण्यात आले. त्या खरेदी प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणी चौकशीसाठी कॉंग्रेस सरकारने एक आयोग नेमला. त्या आयोगाने ऑगस्टच्या अखेरीस सरकारकडे अहवाल सादर केला. अहवालातून ५०० कोटी रूपये वसूल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आता त्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्याच्या उद्देशातून राज्य सरकार एसआयटी आणि मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संबंधित निर्णय घेण्यात आला. मुडा घोटाळ्यावरून भाजप आणि जेडीएस या कर्नाटकमधील विरोधी पक्षांनी कॉंग्रेस सरकार आणि सिद्धरामय्या यांच्या विरोधात रान उठवले आहे. त्यांनी सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अर्थात, काहीच चुकीचे केले नसल्याची भूमिका कायम ठेवत सिद्धरामय्या यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली आहे. आता भाजपला राजकीय प्रतिशह देण्यासाठी कॉंग्रेस करोना संकटकाळातील घोटाळ्याचे भांडवल करणार असल्याचे सूचित होत आहे. त्यातून आगामी काळात कर्नाटकमधील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. सिद्धरामय्या यांच्या पाठिशी मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी सिद्धरामय्या यांच्या पाठिशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. कॉंग्रेस श्रेष्ठींनी सिद्धरामय्या यांना अभय दिले असल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे. कर्नाटकात नेतृत्वबदल होणार असल्याच्या राजकीय कंड्या पिकल्या आहेत. त्याविषयीची चर्चा थांबण्यासाठी स्पष्ट संदेश द्या, असा आदेशही पक्षश्रेष्ठींनी सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांना दिल्याचे समजते.