नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभव पत्कारावा लागला. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढवली, पण केवळ 16 जागांवर विजय मिळवण्यात काँग्रेसला यश आले. त्यामुळे राज्यात काँग्रेस नेतृत्व बदलाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यातच नाना पटोले यांनीही आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, नाना पटोले यांनी मंगळवारी दिल्लीवारीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर लवकरच राज्यात काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार असल्याचे बोलले जात आहे. आता महाराष्ट्रात काँग्रेसची कमान कोणाकडे जाणार, काँग्रेसचं नेतृत्व कोण करणार याची उत्सुकता लागली असून राज्यातून 4 नावे पुढे येत आहेत. त्यामध्ये, एक नाव मराठवाड्यातील असून दुसरं नाव विदर्भातील आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील दोन नेत्यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र, काँग्रेसचे निष्ठावान आणि आदिवासी नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाना पटोले यांच्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी कोल्हापुरातील नेते व माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, तर लातुरातून अमित देशमुख यांच्यात स्पर्धा पाहायला मिळत आहे. तसेच, विश्वजीत कदम यांचेही नाव समोर येत आहे. त्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महारष्ट्रातील नेत्यांपैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते की, विदर्भातील हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसकडून संधी मिळते, हे लवकरच स्पष्ट होईल.