रस्त्यावरून कॉंग्रेस-भाजपात कुरघोडया; जुना पुणे-मुंबई रस्ता उद्यापासून होणार सुरू ?

पुणे : रखडलेले रस्ता रूंदीकरण आणि महामेट्रोच्या कामामुळे जुन्या पुणे- मुंबई महार्गावर अंडी उबवणी केंद्र ते बोपोडीपर्यंतचा रस्ता पिंपरी-चिंचवडकडे जाण्यासाठी एकेरी करण्यात आला आहे. हा रस्ता सुरू करण्यावरून गुरूवारी पुणेकरांना राजकीय कुरघोडयांचा खेळ पहायला मिळाला. मागील आठवडयात हा रस्ता पुन्हा सुरू करण्याबाबत पोलीस, महापालिका आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यानंतर, हा रस्ता सुरू करावा या मागणीसाठी कॉंग्रेसने गुरूवारी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.
मात्र, कॉंग्रेसच्या आंदोलनाआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा रस्ता उद्या 1 सप्टेंबर पासून सुरू करणार असल्याचे जाहीर करत कॉंग्रेसच्या आंदोलनाच्या ठिकाणी फ्लेक्स लावत कॉंग्रेसवरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. या रस्त्यावर महामेट्रोचे काम सुरू होते. त्यातच, या रस्त्याचे रूंदीकरण प्रस्तावित असले तरी बोपोडीच्या जवळ पुण्याच्या दिशेने जाताना दोन्ही बाजूच्या जागांचे भूसंपादन रखडल्याने मोठ्या प्रमाणात बॉटलनेक स्थिती तयार होऊन वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे, या रस्त्यावर पुण्याकडून पिंपरी-चिंचवडकडे जाणाऱ्या वाहनांना एकेरी वाहतुकीस परवानगी होती तर पिंपर-चिंचवडकडून येणारी वाहने खडकी बाजाराकडून होळकर पूल आणि पुढे अंडी उबवणी केंद्राकडे वळविण्यात आली होती.
तसेच होळकर पूलावरून येरवड्याकडेही जाता येत होते. मात्र, आता या रस्त्यावर महामेट्रोचे काम जवळपास संपले आहे. तर बोपोडीच्या परिसरातील रूंदीकरणाची जागाही महापालिकेने ताब्यात घेतली असून रस्त्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर पूर्वीप्रमाणे दुहेरी वाहतूक सुरू करण्याची मागणी झाल्यानंतर पथ विभाग, वाहतूक पोलीस, महामेट्रो तसेच खडकी कॅन्टोंन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची संयुक्त पाहणी केली असून त्यानुसार, रस्ता सुरू करण्यासाठीच्या उपाय योजना केल्या जाणार होत्या. मात्र त्या पूर्वीच भाजपने बुधवारी रात्रीच हा रस्ता 1 सप्टेंबर पासून हलक्या वाहनांसाठी सुरू करण्याची घोषणा करून टाकली आहे.
कॉंग्रेसने केले आंदोलन
दरम्यान, हा रस्ता दुहेरी करावा या मागणीसाठी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी गुरूवारी सकळी आंदोलन केले. या रस्त्याचे काम पूर्ण होत असल्याने तो लवकर सुरू करावा अशी मागणी करण्यात आली. मात्र, त्यापूर्वीच रस्ता शुक्रवार पासून सुरू होणार असल्याच्या जाहीराती लावण्यात आल्याने यावेळी आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली.
भाजप प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेत असून रस्ता अर्धवट आहे. त्यामुळे तो पूर्ण करून सुरू करावा यासाठी आमचे आंदोलन असताना भाजपने परस्पर तो सुरू करण्याची घोषणा कोणत्या आधारावर केली असा सवाल बहिरट यांनी उपस्थित केला आहे. तसेच, अर्धवट रस्ता झाल्याने अपघात अथवा दुर्घटना झाल्यास संबधितावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.





