काँग्रेसकडून अभिषेक मनु सिंघवीना राज्यसभेची उमेदवारी जाहीर; ‘तो’ पराभव लागला होता जिव्हारी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांना काँग्रेसने पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आमदारांच्या बंडखोरीमुळे त्यांचा धक्कादायक पराभव झाला होता. मात्र यावेळी त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तेलंगणामध्ये राज्यसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सिंघवी यांच्या नावाची घोषणा केली आहे.
‘या’ ठिकाणी होणार निवडणूक
के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षातील के. केशव राव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे. हिमाचल प्रदेशात सिंघवी यांना पराभवाचा धक्का बसला होता. पण आता ते तेलंगणातून ते राज्यसभेवर जातील.
‘या’ कारणामुळे हिमाचल प्रदेशात झाला होता पराभव ?
मार्च महिन्यात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत सिंघवी यांचा पराभव झाला होता. यावेळी काँग्रेसकडे 40 आमदार होते. पण त्यापैकी सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यामुळे सिंघवी यांना 34 तर भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांनाही 34 मते मिळाली. त्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली आणि महाजन यांचे नाव निघाले. त्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात धाव घेतली होती.





