Voter List : नालासोपारा मतदार यादीत घोळ; एकाच महिलेचे नाव सहा वेळा, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

पालघर : निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील गोंधळाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा विधानसभा मतदारसंघात 39 वर्षीय महिलेचे नाव तब्बल सहा वेळा मतदार यादीत आढळल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक नोंदीसह वेगवेगळा इलेक्ट्रर्स फोटो आयडेंटिटी कार्ड (EPIC) क्रमांक जोडलेला आहे.
या प्रकरणाने सोशल मीडियावर वादळ उठले असून, विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे. याप्रकरणी पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असून, लवकरच यासंबंधीचा अहवाल सादर केला जाणार आहे.
नेमकं काय घडलं?
2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत नालासोपारा मतदारसंघात एकाच 39 वर्षीय महिलेचे नाव सहा वेळा नोंदवले गेले आहे. यापैकी पाच नोंदी नीलमोरे येथील एका मतदान केंद्रावर, तर एक नोंद तुळींज येथील दुसऱ्या मतदान केंद्रावर आढळली आहे.
प्रत्येक नोंदीसह समान छायाचित्र, पतीचे नाव (संजय गुप्ता), आणि निवासस्थान (माता जिवदानी चाळ) यांसारखी माहिती आहे, परंतु EPIC क्रमांक वेगवेगळे आहेत. एका नोंदीत महिलेचे नाव ‘गुप्ता गुप्ता’ असे नोंदवले गेले आहे, ज्यामुळे हा प्रकार अधिकच संशयास्पद ठरला आहे.
#votechoriexposed https://t.co/iFZLalWkWq
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 13, 2025
जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
पालघरच्या जिल्हाधिकारी इंदु जाखर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित महिलेने जानेवारी 2024 मध्ये ऑनलाइन अर्जाद्वारे मतदार नोंदणी केली होती. EPIC कार्ड तातडीने मिळेल या समजुतीत तिने चुकून सहा वेळा अर्ज सादर केल्याचे समोर आले आहे.
यामुळे तिचे नाव यादीत सहा वेळा नोंदले गेले. सध्या पालघर जिल्हा प्रशासनाने डुप्लिकेट नोंदी हटवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सर्व बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLOs) यांना मतदार यादीची कसून तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Nalasopara voter list |
EPIC म्हणजे काय?
EPIC म्हणजेच इलेक्ट्रर्स फोटो आयडेंटिटी कार्ड, ज्याला सामान्यपणे मतदार ओळखपत्र म्हणतात. भारत निवडणूक आयोग 18 वर्षांवरील नागरिकांना मतदार नोंदणीनंतर हे ओळखपत्र जारी करते. या कार्डाचा उपयोग मतदानासाठी तसेच भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी होतो. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार मिळतो.





